पोटभरू सूप

  • एक वाटी मूग डाळ २ तास भिजवून
  • १ बटाटा साली काढून-चिरून, १ कांदा चिरून, १ टोमॅटो उकडून
  • इतर भाज्याः दुधी अधपाव साली काढून चिरून, घेवडा, गाजर इत्यादी आवडीच्या भाज्या
  • अर्धा टीस्पून तेल/तूप/लोणी
  • चिमूटभर जिरे, मिरीचे ६-८ दाणे, १ मिरची आवडत असल्यास, चवीनुसार मीठ
४५ मिनिटे
दोन माणसांना दोन दिवस पुरेल!

ह्या पदार्थात पूर्वतयारीस महत्त्व आहे. मूगडाळ २ तास भिजवल्यावर मस्त फुलून येते. सर्व भाज्या धुवून चिरून घ्याव्यात. एका पॅनमध्ये तेलात / तुपात जिरे व मिरीची फोडणी करून त्यांत अनुक्रमे कांदा, बटाटा, इतर भाज्या घालून परतावे. कोरडे वाटल्यास पाण्याचा हलका हबका मारावा. नंतर त्यात भिजलेली डाळ निथळून घालावी. उकडलेल्या टोमॅटोची प्युरी वेगळी काढून घ्यावी. नंतर हे सर्व मिश्रण जरा शिजले की गॅसवरून उतरवावे. जरा थंड झाल्यावर मिक्सरमधून पाणी घालून बारीक वाटून घ्यावे. त्या मिश्रणाला दोनदा गाळावे. गाळण्यात खाली उरलेला भाज्यांचा साका इतर भाज्या, आमट्या, ग्रेव्हीज मध्ये वापरावा. आता गाळून घेतलेले सूप पुन्हा गॅसवर गरम करावे. पाणी, आवडत असल्यास मिरची व चवीप्रमाणे मीठ घालून उकळावे. गरमागरम, दाट, पोटभरून सूप तय्यार!

हे सूप पोटात इतके अलगद व दमदार बसते की इतर काही खाण्याची गरजच वाटत नाही. फ्रिजमध्येही टिकते. विविध भाज्या व मूगडाळ वापरल्याने पौष्टिक व प्राण ऊर्जेने भरपूर असा हा पदार्थ आहे.

ह्या सुपात आपण अनेक पर्याय, कल्पकता वापरून त्याला अजून पोषक बनवू शकतो.

फक्त मूग डाळीऐवजी थोडी तूर डाळ भिजवून, मोड आलेली कडधान्ये, हिरवे/पिवळे मूग शिजवून वापरता येतील. भाज्यांमध्येही लाल भोपळा, फ्लॉवर, स्वीट कॉर्न, पालक, अळंबी, कोहळा इ. भाज्या वापरता येतील.

वरून सजावटीसाठी ओले खोबरे, कोथिंबीर किंवा क्रीम/ किसलेले पनीर घालू शकतो.

एक अतिशय स्वादिष्ट, पोट भरणारा, आरोग्यदायी व 'डाएट' संकल्पनेत बसणारा हा पदार्थ आहे. जेवणाअगोदर हे सूप कपभरून प्यायले तरी क्षुधाग्नी शांत होतो व इतर अन्न(पोळ्या, भात) कमी खाल्ले जाते हा माझा अनुभव आहे.

आई