धुमकेतू

सूर्याचे तळपणे नित्याचे, पोळवणे नित्याचे
चंद्राचे कलेकलेने निखरणेही नित्याचे
आणि.... नित्याचेच चांदण्याचे चमचमणे!
कशाकशात म्हणून नावीन्य उरले नसताना
अशात गुदमरलेल्या घन धूसर क्षितिजावर
त्याचं अनाहूत दिसणं, अव्यक्त ओढ जागवतं
देदीप्यमान पिसारा मनाला भुरळ पाडतो
वाटतं, "अरे! हेच ते... हेच ते! जे मी आजवर शोधले! "
मी बाहू पसरून त्याच्या स्वागतास सज्ज होतो..
तो मात्र त्याच्या 'कक्षेशी' अन 'गतीशी' पाईक!
आल्या वेगाने, माझ्या रानाचा एक लचका तोडून पसार होतो....
........ पुन्हा त्या अंधारात!
आणि मी?
बावरून, सावरून... पुन्हा सज्ज माझ्या सूर्याच्या स्वागतास!
"छे! छे! काहीच नाही झालं! "
__________________
प्रकाश