अग आई मी तुझी चिमुकली बोलत्येय;
उंच भरारी न मारणारी;
किनाऱ्याशीच खेळणारी;
स्वतःच एकसुरी गाणं स्वतःशीच समाधानाने गाणारी.
तुझ्यापासून दुरावण्याची जाणीव आई;
मला नाइलाजाने मान्य करावीच लागली;
कारण मला माहितिय या जगात;
माझ्या येण्याची पाऊलवाटच नव्हती.
समुद्रच्या काठी मी उभी असावी;
पायाखालची वाळू क्षणाक्षणाला निसटून जावी;
तुझ्या गर्भातून मला वेगळं करण्याच्या वेळेला;
थोपवण्याची केविलवाणी धडपड मी करावी.
तू अगतिक अन हतबल आहेस आई;
हे पहिल्यापासून मला कुठेतरी जाणवत होत;
पण काय करू माझे लाडके आई;
तुझ्या आश्वासक गर्भात राहणं मला आवडत होत.
तुम्हा साऱ्यांपेक्षा मी वेगळीच होते जशी;
तुझ्या डोळ्यात वेडी स्वप्न पाहणारी;
मी नेहमीचं साधीभोळी राहिले;
अबोल वेडीखुळी तुझी चिमखडि.
मला वाटत मी तुझ्या गर्भातून;
सहजपणे वेगळी केली जाईन;
तुझ्याबरोबर जगलेल्या आठवणींमुळे;
स्वर्गातसुद्धा मी बेचैनं होईन.
दोष मी कोणालाच देत नाही;
आपल्या दोघींचा नाइलाज होता;
आपल्या दोघींचा सुंदर प्रवास;
नियतीने इथेपर्यंतच लिहिला होत.