मनातही..... गारवा

    लोणावळा, चांगले ठिकाण आहे, दोघांना फिरण्यासाठी. पण माझ्या नशिबात ते नाही. गेले दोन वर्षे नियमित जातोय, मैत्रिणीला नाही तर मित्राला घेऊन. त्याला गर्लफ्रेंड नाही, म्हणून तो नेहमी सोबत येतो. पण आज काहीतरी वेगळेच वाटतेय. मी लोणावळ्यालाच आहे. माझ्या सोबत माझा मित्रच नाही तर सगळा ऑफिस स्टाफ देखिल आहे. आमच्या कंजूस कंपनी-मॅनेजमेंटला कसे सुचले कुणास ठाऊक, आज इथे चांगले हॉटेल बुक करून सगळ्यांना घेऊन आलेत.

    नेहमी प्रमाणे मी व माझा मित्र बाहेर फिरून हॉटेलमध्ये परत येतो, ऑफिसचा इतर स्टाफ देखिल बाहेर कुठेतरी फिरायला गेलेला आहे. मला घरी एक फोन करायचाय म्हणून मोबाईल ट्राय करतो, पण नेटवर्क चा पत्ता नाही. म्हणून खाली रिसेप्शन काउंटरवर फोन लावायला जातो. रिसेप्शन काउंटरला तर आमच्याच कंपनीची ऑफिस-कॉर्डीनेटर बसलेय. बॉसने बिचारीला इथेपण ड्यूटीवर लावलेय का, मला तिची दया येथे.

    सगळे बाहेर फिरायला गेलेत, आणि हि इथे एकटीच काय करतेय मला समजत नाही. कदाचित कुणाचीतरी वाट बघत असेल. मी रिसेप्शन चा फोन घेऊन सोफ्यावर बसतो, आणि नंबर डायल करतो. तेवढ्यात ती माझ्या शेजारी येऊन बसते. मी फोन चा रिसीव्हर खाली ठेवतो.  

    अरे, तू बाहेर फिरायला नाही गेलीस?,....  मी बोलण्याची सुरवात करतो.

    नाही,.... ती म्हणते.   

    का?,.... मी विचारतो.

    असच!.... ती म्हणते.

    असंच?.... तर मग माझ्या सोबत येतेस का फिरायला?,.... आता पर्यंत छप्पन्न पोरी फिरवल्या आहेत इतक्या सहजतेने मी तिला विचारतो.

   ह्म्म ओके ठीक आहे,.... ती देखिल तेवढ्याच सहजतेने गालावर खळी आणत उत्तर देते. आज सूर्य पश्चिमेला तर उगवला नसेल ना.. कुणास ठाऊक. असेल देखिल,  बाहेर तर सगळीकडे ढग पसरले आहेत

    बाहेर निघताना ती तिचे जॅकेट घेते, तर मी छत्री घेतो. बाहेर काही वेळापूर्वीच पाऊस थांबला आहे, पाण्याचे प्रवाह ठिकठिकाणी भरून वाहतायेत. हॉटेलच्या जवळच सेंट मेरी व्हिला  नावाचा एक चांगला स्पॉट आहे. माझा फेव्हरेट. आतापर्यंत कितीतरी फिल्म्सच्या-गाण्यांच्या शूटिंग इथे झाल्या असतील. आज इथे कोणच नाहीये, फक्त आम्ही दोघे. दरीतून येणारे ढगांमुळे क्लायमेट मस्तपैकी रोमॅटिक झालेय. दोघेही पाण्याच्या ओहोळांवरून उड्या मारत एकमेकांना सांभाळत दरीच्या कड्यापर्यंत पोहोचतो. ती जरा जास्तच ऍडव्हेंचरस आहे. दरीतून ढगांआड मला वॉटरफॉल दाखवत म्हणते.... इट्स सो ब्यूटिफुल... ना? मी मात्र वॉटरफॉलच्या ऐवजी तिलाच जास्त बघतोय.

   जास्त पुढे नको जाऊस, इट्स क्वाइट स्लिपरी हिअर.... मी तिला सूचना करतो, ती दोन पावले मागे येते.

   कंपनीत इतके दिवस सोबत होतो, पण आम्ही कधी फोनवर ऑफिशिअल बोलण्यापलीकडे गेलो नव्हतो. समोरासमोर क्वचितच बोलणे झाले असेल. आज हातात हात घेऊन फिरतोय, खूप वर्षांपासून एकत्र असल्या सारखे. कशाचीच पर्वा नाही....

 .... प्रिये... मनातही.. काजवा.. नवा नवा... मिलिंद इंगळेंच्या गारव्याच्या ओळी मला अचानक आठवतात. माझा हात पुढे करून तिच्या मनाला साद घालावीशी वाटते. मी तिच्याकडे पाहतो, ती नजरेनेच.... काय? असे विचारते.

   काही नाही गारव्याच्या ओळी आठवल्या.... मी म्हणतो.  ती गोड हसते... अन मी देखील. दोघेही पुन्हा एकदा ढगांआड उसळणारे पाण्याचे झरे शोधायला लागतो.

   इतक्यात माझ्या पाठीवर एक थाप पडते, वळून पाहतो तर माझा मित्र प्रश्नार्थक चेहरा करून उभा आहे. हा कशाला इथे आला, मला खरोखर त्याचा राग येतो. ती मात्र चेहऱ्यावर कोणतेही हावभाव न आणता दूरवर पाहत असते.

काय रे, जुन्या मित्रांना विसरलास का?.... तो विचारतो

अरे नाही तर. असच सहज फिरायला आलो होतो...

पण नेहमी तर माझ्या सोबत फिरतोस ना?.... तो उगाचच निरागसतेचा भाव चेहऱ्यावर आणत विचारतो.

बरं झाले ती दूर आहे, तिला आमचे बोलणे ऐकू जात नसेल.... कदाचित

थोड्यावेळात आम्ही हॉटेल कडे परत येतो.

    हॉटेलमध्ये सर्वजण गरमागरम सूप पिण्यात बिझी आहेत. माझा मित्र देखिल त्याच्या मध्ये गायब होतो. इतरांना तो माझ्याबद्दल गॉसिप वगैरे काही सांगणार नाही याची मला खात्री आहे, मित्र आहे ना..

   आम्ही दोघे मात्र रूमकडे वळतो. तीच्या डोअर पर्यंत आल्यानंतर ती जॅकेटमधून रूमची चावी काढते. माझी रूम वरच्या मजल्यावर आहे.

तिच्यापासून दूर जाण्याअगोदर मी थोडावेळ तिथेच थांबतो.

थँक्स!... मी म्हणतो.

कशासाठी?.... ती विचारते.

माझ्यासोबत आल्याबद्दल,.... मी म्हणतो.

नो, थँक्स टू यू... फॉर सच अ नाईस ट्रिप, तुझ्यासोबत मी सुद्धा एन्जॉय केले,.... ती पुन्हा एकदा गालावर गोड खळी आणत म्हणते.

वेल, ऍक्च्युअली तुझ्या अगोदर मी कधी कुणासोबत डेटिंगवर गेलो नव्हतो.... मी विषय वाढवतोय.

ओह रिअली? दरवाजाच्या चाव्या सोडून ती माझ्याकडे वळते.

   ती माझ्या जवळ आलेय, फक्त एका फुटाचे अंतर आमच्यात उरलेय. मी तिच्या डोळ्यांमध्ये हरवत चाललोय अन ती माझ्या. बाहेरचा पाऊस आणि वारा या क्षणाप्रमाणेच थांबलेले वाटतायेत. सर्व काही स्तब्ध झाल्यासारखे वाटतेय, आणि......

   तितक्यात आमचा बॉस कुठूनतरी उगवतो. दोघेही त्याच्या अचानक येण्याने भांबावून गेलो आहोत. हा इथे कशाला आला, नीट गप बसून सूप गिळता येत नाही का... मी मनातल्या मनात म्हणतो

अरे तुम्ही अजून इथेच?... तो विचारतो. त्याने माझ्या मनातला विचार कदाचित ओळखला आहे

दोघांनाही काय बोलावे सुचत नाही

   दोघेजण एकत्र हं! काय विचार काय आहे, या वर्षी लग्नाचे लाडू मिळणार वाटतंय.... टॉण्ट मारून तो हसत बसतो. बॉस आहे ना.. काहीही बोलण्याची परवानगी आहे.

   मला घाम सुटायला लागलाय, तेवढ्यात मोबाईलचा अलार्म वाजतो, मला जाग येते. अलार्म बंद करून मी स्व:ताशीच हसत बसतो.