लहानपणी शाळेत तुझी झाली भेट;
एक नवी मैत्रीण म्हणून;
जगण्याच्या संकल्पनाही न कळल्या तेव्हा;
तुझा हात धरला आधार म्हणून.
या माणसांच्या बाजारात;
मला सगळंच अनोळखी वाटायचं;
तुझं माझं मैत्रीच नातच फक्त;
मला माझ हक्काच वाटायचं.
तारुण्यातल्या नवथर गोष्टी;
आपण एकमेकींना सांगत गेलो;
आपल्या मैत्रीच्या विश्वात रमताना;
क्षणाक्षणाला वाढत गेलो.
सप्तपदी चालताना सुद्धा;
माझी नजर तुलाच शोधितं होती;
मनात होतो हुरहुर नव्या जोडीदाराची;
पण तुझी नजर मात्र आश्वासक होती.
रमत गेले मी ससांरात नकळत;
तुझ्या पासून अस्तित्वाने मी दूर झाले;
पण तुझ्या मैत्रीची ओढ इतकी की;
तुझ्या आठवणींचीच मी मैत्रीण झाले.
आयुष्याचा या कातरवेळी ;
समजलेल्या आयुष्याचे बरेच अर्थ तुला सांगायचेत;
जगण्याच्या धावपळीत राहिलेले बरेच क्षण;
फक्त तुझ्या मैत्रीत जगायचेत.