त्यांनी विचार केला जरा हटके-
नाणे लहान केले, अन केले हलके
पावलीचा प्रवास संपला, जरा खटके
पेट्या-खोक्यांना भाव आला, जन खुरटले
त्यांनी विचार केला जरा हटके-
वस्त्रांना रूप दिले जर लटके
पदराचे ढळणे संपले, जरा खटके
लाजेने स्ट्रिपटीज भोगला, जन बहकले
त्यांनी विचार केला जरा हटके-
शाळांना ताब्यात घेतले, शिष्य नटले
विद्यादान घेणे संपले, जरा खटके
वाईनची तीर्थ झाले, जन निर्ढावले
त्यांनी विचार केला जरा हटके-
मंत्र गवसला गरिबी हटाव म्हटले
गरीब रस्त्यावर आला, जरा खटके
सत्तेला अखंड सौभाग्य लाभले, जन भरकटले
त्यांनी विचार केला जरा हटके-
मातीचे सोने करण्या कारखाने हटले
पागोळ्याच्या धारा संपल्या, जरा खटके
टावर राहिली उभी, जन गुदमरले
आभाळ घुसमटले, आभाळ घुसमटले !