तू

तू

कसं सांगू तुला ?

तू माझी कोण आहेस...

     तू तर समुद्राची लाट आहेस

     माझ्या जीवनाची पायवाट आहेस

     कधीही न संपणारी...

     अगदी...

     दूरवर गेलेली.

तू तर जगाची रीत आहेस

माझ्या जीवनाची प्रीत आहेस

कधीही न भंगणारी...

घर करून,

हृदयात बसलेली.

     तू तर रात्रीचा आरंभ आहेस

     माझ्या जीवनाचा प्रारंभ आहेस

     स्वतःला काळोखात झोकणारी...

      मला,

     निद्रेच्या कुशीत सोपावणारी

तू तर पणतीची ज्योत आहेस

माझ्या जीवनाची प्राणज्योत आहेस 

स्वतः जळत जाणारी.

जळतांनाही

प्रकाश देणारी.

     अगं... तूच... तूच

     माझ्या जीवनाची पहाट आहेस

     स्वतःही रंगणारी...

     अन माझं,

     आयुष्य रंगवणारी...

अगं वेडे... कसं सांगू तुला

तू माझी कोण आहेस,

माझा प्राण आहेस तू...

तूच माझं,

सर्वस्व आहेस.