नसांतून साऱ्या आता संचार पोकळीचा
समाजा, तुलाही आता आधार पोकळीचा
उमाळा तराळांचा त्या ओझ्यावरून मोजा
कुणी मांडला हा जोखा बाजार पोकळीचा
किती ओढ आत्मीयांना, मी राहिलो न माझा
नको स्पर्श कोणा माझ्या नादार पोकळीचा
पराभूत झालो केव्हा, मी जिंकलो कितीदा
न दैवा चुके त्या अंती, शेजार पोकळीचा
तसे देव सप्ताहाचे नेमून सर्व झाले
नवी नोंद व्हावी आता, ना वार पोकळीचा
नको धूर संघर्षाचा, कोणी न दाद देई
पहा जाळ अंधारीही, झुंजार पोकळीचा