ऐक मनाचे ...!

ऐक मनाचे, होय, घडू दे आज गुन्हा,
सजून येते रात्र अशी का पुनःपुन्हा ?

स्मरकातर ही वेल तनूची थरथरते,
स्पर्शा-स्पर्शामधून अमृत पाझरते
होय हवाही अजून मादक क्षणक्षणा ॥१॥

टिपूर आहे जसे चांदणे पडलेले
तसेच काही तुझ्या मनीही दडलेले,
अमूर्त होते सुमूर्त आहे, जाण खुणा ॥२॥

कितीक ते क्षण जुने जुने तुज आठवती,
मर्मबंध: मौनाची भाषा ओघवती!
भोग मनाचा नवानवासा जुनेपणा ॥३॥

झुगारून दे नीती-मर्यादांची झूल
उच्छृंखलता नसे, नसे ही फसवी भूल
पवित्रतम हे, ही पापाची विटंबना ॥४॥

नसे वासना, बीभत्साचे नसे रडे
सुखद कल्पना, दोन जिवांचे ऐक्य घडे
ह्या मोक्षाला गुन्हा ठरवणे हाच गुन्हा ॥५॥

                   - चैतन्य दीक्षित