माझ्याही आठवणीतल्या कविता

धावत धावत आला बालक मिठी मारूनी म्हणतो "आई"
हरिणीला जणू बिलगे शावक , न कळे कसली इतुकी घाई.
"अपूर्व सुंदर अतिशय सुंदर ओळख आई काय पाहिले? "
"खार नाचरी? पोपट चिमणा? मोर मनोहर? " "छे छे चुकले. "
"श्रेष्ठींच्या नवरम्य मंदिरी आजच गेलो खेळायाला
पुनवेचे जणू शुभ्र चांदणे खेळ संपता कुमार प्याला.
काय असे हे सहज पुसे मी टकमक दासी सगळ्या बघती
कळे न चुकले काय मला ते पदर लावूनी मुखास हसती.
कुमार हसला, शुभ्र पेय ते मटमट मिटक्या मारित प्याला
अश्वत्थामा वेडा किती हा टुकटुक करूनी मला म्हणाला.
गोड गोड मज सांज सकाळी दूध देतसे माझी आई
नाव न ठावे तुझ्या आईची मुळीच तुजवर माया नाही.
जाई जुईच्या फुलासारखे शुभ्र मला ते दूध आई दे.
झोंबून अंगा वेगे रागे दूध हवे मज दूध दे वदे.
पाषाणाच्या मूर्तीपरी ती निश्चल आणिक मूक माऊली
चिंतन करिते कळे न कसले हलली हळूहळू तिची सावली.
कुटीत जाई मंद पावली लगबग ये ती परी बाहेरी
शुभ्र पांढऱ्या पेये भरला द्रोण देतसे बाळाच्या करी
हासत मटमट मारित मिटक्या बाळे केला द्रोण रिकामा
प्यालो मी रे दूध कुमारा गर्जत जातो अश्वत्थामा.
जाई जुईची फुले, चांदणे लाजून ज्याला पळतील भुरभुर
असे दूध मी प्यालो आई अपूर्व सुंदर, अतिशय सुंदर
ब्रम्हानंदी बाळ रंगला स्फुंदू लागे परी माऊली
टपटप गळती तिची आसवे बाळाच्या मम कोमल गाली.
मनी चरकुनी पोर विचारी झाले आई काय तुला गे?
स्फुंदत रडते मनात कढते उरी धरी ती त्या आवेगे.
सांगावे ते कसे तियेने बाळा तुजला मी फसवियले
दूध नव्हे रे पिठात पाणी कालवुनी तुज राजा दिधले.
घळघळ गळती तिची आसवे पुसू शके ना बालक हाते.
थरथर कापत उभी माउली भग्न हृदयीचे रुधिर वाहते.
जखम आईच्या काळजातली युगेयुगे ती वाहत आहे.
बुद्ध, ख्रिस्त अन गांधी आले, गेले तरी ती तशीच वाहे.

या कवितेचे कवी मला माहित नाहीत. ही कविता मला सहावीत होती. आजही वाचून डोळे पाणावतात.