काय प्रिया फुगवा हा... टम्म पुरी झालिस ना !

प्रेरणा : भूषण यांची, 'काय प्रिया रुसवा हा'
संकल्पनाः पहिले कडवे - मुलगा मुलगी बघायला गेलाय, आणि ती अंगाने स्थूल आहे. मुलीचं नाव- प्रिया.
                 दुसरे कडवे- मुलगी मुलगा बघायला गेलीये, आणि मुलगा चेहऱ्यावरून पक्का 'रंगेल' वाटतोय.
                 तिसरे कडवे- ह्या मुला-मुलीचे आई वडील, त्यांचं कुठेच जमत नाही म्हणून हताश आहेत.

हाय किती विकट असे हास्य तुझ्या गालावर,
आशा या पापण्यांतली आली भानावर,
सदऱ्याचे अत्तरही घाबरून बसलेले,
कोरड पडते घशास, आवंढे गिळलेले ।

गालांची व्याप्ती वर लोचनांकडे धावे
वस्त्रेही आसुसली, 'बंध कधी सैलावे? '
देहाची लतिका मम कल्पनेत रमलेली
मूर्तिमंत भीती पण मजला तू गमलेली ।

गेला बघ वेळ किती, व्यायामा गेलिस ना,
काय प्रिया फुगवा हा, टम्म पुरी झालिस ना ।

काल रात सारी दिसतोस कुठे गेलेला,
घरचे झोपी गेले, हेच बघुन घुसलेला.
कोनाडा छातीचा, ओठांना आणि तडे,
एक उसासा केवळ, बोलु काय प्रश्न पडे

इतका कसला आला ज्वानीचा माज तुला,
आमंत्रण देते का कोणितरी रोज तुला?
कुठल्याही कामावर लक्ष तुझे लागेना,
'कामा'विण काहीही आणि तुझे भागेना

(स्वगत) नवऱ्याची माझी पण क्रेझ पुरी गेली ना
काय प्रिया! कितवा हा? लिस्ट पुरी केली ना?

(मुलीच्या आई वडिलांचे स्वगत)
चुकले अमुचे मुलगे दाखवुनी तुला प्रिया,
जा घरटी अपुल्या, शोधून तूच मुला प्रिया
दाराची महिरप ही सज्ज घालवायाला,
एकदा तरी म्हण ना, 'मी तयार जायाला'

(मुलाच्या आई वडिलांचे स्वगत)
आता तस्वीर तुझी हाती घेतो आहे,
दोन मुली, शेवटच्या तुज दाखवतो आहे
असला कसला तू रे पूर्णपणे हुकलेला?
कुंडलीतला अमुच्या तारा तू चुकलेला.

बघ मित्रांची तुझ्या वरात पुढे गेली ना,
काय खुळ्या, अमुची हयात पुरी गेली ना !!