पुरुषांचा पिंपळ .......

एका वाळवंटी उगवले, रोप पिंपळाचे,
नीर शोधण्यास गेले, खोल मूळ त्याचे.

सोडुनिया माय काळी, वाळूत न थिजले,
निवडुंगाच्या भूमीवर, काय भाग्य ह्याचे ?

आसमंती झेप ह्याची, आहे दैव वेगळे,
मरुभूमीच्या पोटात नसता, अवशेष जळाचे.

बसता पायाशी मिळाले, ऋण सावलीचे,
विचारता बोलते झाले, खोड त्या तरूचे.

" सांगतो तुजला मित्रा, गुपित ह्या जिण्याचे,
भेटावयास मजला येती, पुरूष ह्या गाविचे.

यंत्रावर काळीज ज्यांचे, असे राबणारे रावे,
भुकेल्या पोटांसाठी सोसती, भोग ह्या जगीचे.

सांगती घडलेले सारे, अन हितगुज मनीचे,
खोडात लपवूनी चेहरा, ढाळती ओघ आसवांचे.

मद्याच्या, पदराच्या नि खांद्यांच्या हे पलीकडले,
लागतो अंमळ पैसा, धरण्यास पाय त्या देवाचे.

मी न कोण विभुती, हे निसर्गाचेच देणे,
माझी ही सावली आहे, लेणे भवदु:खाचे."

 - अनुबंध