माझ्यासमान तूही गंधाळतेस का गं?

२९ नोव्हेंबर, १९९७ किंवा १९९९ ( नक्की आठवत नाही.)

पुण्याच्या कोहिनूर मंगल कार्यालयात माझ्या मामीच्या नात्यातील एका मुलीचे लग्न होते. मामी रत्नागिरीची, 'सड्यावरचे लिमये' या नावाने तिचे माहेर लोकांना ठाउक होते. मामीच्या माहेरच्या कुणाचेतरी लग्न असल्यामुळे अर्थातच आम्हाला बोलावणे असण्याचे कारणच नव्हते.

पण...

अचानक मामीने आईला आमच्या शेजारी फोन करून मला व माझ्या पत्नीला कोहिनूर कार्यालयात सांगीतले. ( तेव्हा आमच्याकडे कसला फोन असणार? )

मी व माझी बायको होतो माझ्या चुलत भावाकडे होतो. तिथे आईचा फोन आला. आम्ही एक्साईट झालो होतो. चुलत भाऊ व चुलत बहिणीलाही आम्ही 'येता का' असे विचारल्यावर ते एक चतुर्थांश पायावर तयार झाले. लग्नसमारंभात जाण्याआधी एखादी स्त्री किती नटते किंवा आवरायला किती वेळ घेते याची आठवणही न होता माझी बायको व माझी बहीण दोघींनी चपला घातल्या. मी व भावाने दुचाक्यांना किक मारली. पाचच मिनिटात पोचलो कार्यालयात. बाहेर काही माणसे उत्सुकतेने थांबली होती. त्यात माझा जुना एक वर्गमित्रपण होता. तो मला पाहून म्हणाला "तू ही आलास का? " मी म्हणालो "हो"! एवढे म्हणून मी सरळ आत गेलो. कारण मामी आम्हाला घ्यायला दारातच आली होती. मित्र बघतच बसला.

मामी आम्हाला चौघांना घेऊन 'वधूपक्षाशाच्या दाराबाहेर' उभी राहिली. आमचे ठोके वाढू लागले होते. अचानक दार उघडले. कुठल्यातरी विधीसाठी वधू व तिच्या घरातील काही जवळच्या बायका वधूपक्षातून बाहेर येऊन जिना उतरू लागल्या. आम्हाला वाटले, संपला विषय! म्हणून मामीकडे पाहिले तर ति दुसऱ्याच एका प्रौढ स्त्रीला म्हणत होती "यांना आत घेऊन जातेस का? " ती स्त्री म्हणाली "तूच जाकी घेऊन? "
एकंदर, मामीबरोबर आमची वरात आत पोचली.

आतमध्ये आमच्याकडे पाठ करून एक स्त्री उभी होती. हात गजरा घालण्यासाठी डोक्यावर घेतलेले, पिवळी साडी!

मामीने हाक मारली......

"माधुरी?"

माधुरी दीक्षित 'गजरा घालण्याच्या' त्याच पोझिशनमध्ये आमच्याकडे वळली.

मित्रांनो, हम आपके कौन है हा चित्रपट प्रकाशित झाल्यानंतरच्या एक दोन महिन्यातला हा प्रसंग!

आम्ही अक्षरशः जागच्याजागी खिळलो होतो.

ती पडद्यापेक्षा कित्येक पटींने सुंदर दिसत होती.

उंचही बरीच वाटली. अक्षरशः अप्सरा! ( म्हणजे असे बोलू नये हे माहीत आहे, पण ती अख्ख्या भारताचीच धडकन आहे म्हंटल्यावर काय? )

बायको व बहीण तर स्टेंडस्टिल!

आमचा अवतार, आमचे तो धक्का पचवू न शकणे हे आविर्भाव बघितल्यावर ती आधीच हसायला लागली.

मामीने ओळख करून दिली, पण त्या ओळखीला काही अर्थच नव्हता. माझ्या हिचा हा अन ही त्याची ती असली ती ओळख! कारण मुळातच मामीच माधुरीला कितपत आठवत असेल माहीत नाही. माधुरी आपली 'हो का',  'बर' वगैरे!

मी म्हणालो, " आम्ही तुम्हाला पाहायला इतक्या घाईत आलो आहोत की जवळ पेनही नाही अन कागदही नाही, ही एक चिठ्ठी आहे त्याचे दोन भाग करतो, ऑटोग्राफ द्याल का? "

ती हसून म्हणाली " त्यात काय? दे इकडे ते कागद"

लव्ह ... माधुरी

अशा दोन सह्या मिळाल्या!

चित्रपट अभिनेत्यांना वगैरे 'वाट्टेल ते करून पाहायचे' असा आमच्यापैकी कुणाचाच स्वभाव नव्हता. पण त्यावेळी माधुरी एकतर हिट, त्यात ती खरोखरच सुंदर, त्यात ती घराच्या इतक्या जवळ अन त्यात मामी खुद्दच ओळख करून देणार म्हंटल्यावर आम्ही धावलो.

बरीच वर्षे मी ती सही जपली होती.

आता माझी ती मामी जाऊनही चार वर्षे झाली असावीत.

मात्र,

माधुरीचे ते दर्शन असे होते की आम्ही चौघेही अक्षरशः कित्येक सेकंद नुसते पाहतच बसलो होतो. आपल्यासारखी दिसतच नाहीत ही माणसे!

नंतर तो किस्सा काहींना सांगीतला तर त्यांचे आणखीन किस्से कळले, 'माझ्या बायकोचा तिच्याबरोबर फोटो आहे' वगैरे!

नंतर माझ्या बायकोला एका ठिकाणी नोकरी लागली तिथे तर माधुरी 'बोर्ड ऑफ डायरेक्टर्स' वर होती. पण तेव्हा कधीच तसा प्रसंग आला नाही.

त्याच दिवशी कँपमध्ये कबीर बेदी आमच्या अगदी जवळून चालत गेला. तोही असाच रुबाबदार! पण, माधुरीचे दर्शन मात्र मी आयुष्यात विसरणार नाही.

कवीला शब्दात मांडता येणार नाही अशी त्यावेळी ती दिसली! ( हे विधान माझ्यासारख्या कविसाठी आहे: -))

वाचकांपैकी कुणाला काही अनुभव?