आतां पुरे ना..

ऊठ रे आत पुरे ना कोरडे हे राहणे
जाणते मी छळण्या मला नाटक हे तुझे नवे ॥

मासात एकदाच येते पुनवेची ही रात आहे
निखळ चंद्र नीलाकाशी पहा ना विहरतो आहे
निशिगंधात न्हालेले चांदणे मंद आता होणार आहे
परी कां सागर रम्य पहाटे लहरींविना शांत आहे ॥

शुष्कतेचे आक्रमण कधी उपवना मानवत नाही
मधुर माधवीचा संचारही मना कां चाळवित नाही
परि आला बहर कळीचा तो कितीसा टिकणार आहे
फुलल्या फुला न चुंबिता फुलपाखरू कां सुस्त आहे ॥

आठवतात वचने तुझी मनास माझ्या खुलवणारी
अलंकाराविना लावण्ण्याची तुजला खुमारीच न्यारी
पाकळ्या गुलाबाच्या पाहा विखुरल्यात शेजेवरी
लटक्या मौनास सत्त्वर दे समाधी अधरांवरी ॥

ऊठ रे आत पुरे ना कोरडे हे राहणे
जाणते मी छळण्या मला नाटक हे तुझे नवे ॥