मला एक दिवस माझ्या बाबांना भेटायचंय,
खेळायचंय हसायचंय आणि त्यांना बिलगायचंय.
मनं कितीही उदास असले तरी मला हसायचंय,
जरी भरलं पोट तरीही पुन्हा ते भरायचंय.
मला एक दिवस माझ्या बाबांना भेटायचंय....
ऊन आले की वाटते बाबा मला सावली करतील,
ठेच लागली की वाटते बाबा माझा हात धरतील.
गर्दीमध्ये बाजारात पुन्हा फिरायचंय,
आज मात्र बाबाचा हात धरायचंय.
मला एक दिवस माझ्या बाबांना भेटायचंय....
मी वाट पाहतोय त्या दिवसाची,
मागणी घालतोय देवा मी नवसाची.
डोळे भरून त्यांना पुन्हा पाहायचंय,
मांडीवर डोके ठेवून मनं भरून रडायचंय.
मला एक दिवस माझ्या बाबांना भेटायचंय....
तो एक दिवस देशील का देवा?
देईन तुला हवे ते मागशील तेव्हा,
त्याच्या तोंडून मला माझं नाव ऐकायचयं,
आणि त्या हाकेला मला एकदा हो म्हणायचंय,
मला एक दिवस माझ्या बाबांना भेटायचंय....
या लेकराची हाक ऐक ना बाबा,
आई आणि बारकू साठी तरी ये ना बाबा.
मला पुन्हा एकदा अ ब क ड शिकायचंय,
तुम्ही रागावाल म्हणून मला पूर्ण अभ्यास करायचाय.
मला एक दिवस माझ्या बाबांना भेटायचंय....
मी आता तुम्हाला खाऊ नाही मागणार,
नाही रडणार आणि दूध सांडणार.
आई समोर एकदा मला तुम्हाला आणायचंय,
बारकू आणि मला तुमच्या समेत खेळायचंय.
मला एक दिवस माझ्या बाबांना भेटायचंय....
जाताना मला सांगून का नाही गेलात?
वाट पाहिली किती मी तुम्ही परत नाही आलात.
आज तुम्हाला हे परत विचारायचंय,
आतुर आहे मी उत्तर तुम्ही द्यायचंय,
मला एक दिवस माझ्या बाबांना भेटायचंय....
मला आहे विश्वास तुम्ही नाही येणार,
मग सांगा बाबा आम्हाकडे कोन बघणार?
ठरवले आहे तुम्ही आम्हाला फक्त वरून बघायचंय,
कसे जगतो तुमच्या शिवाय हे देवाला सांगायचंय.
मला एक दिवस माझ्या बाबांना भेटायचंय....
निघतो आता मी आई वाट पाहत आहे,
तुमच्यासाठी आणलेला हार मी वाहत आहे.
पण मला पुन्हा एकदा विचारायचंय,
आपली भेट कधी होईल हे ठरवायचंय.
मला एक दिवस माझ्या बाबांना भेटायचंय....!