उत्साह

उत्साहाचे असेच असते
जेव्हा असतो तेव्हा असतो;
जेव्हा नसतो तेव्हा नसतो...

उत्साहाचे असेच असते;
जेव्हा येतो, इतका येतो-
उधाण आलेल्या लाटांगत
खळाळतो!
नसतो तेव्हा
पडल्या वाऱ्यागत
थिजुन कुठेसा
निपचित पडतो...

उत्साहाचे असेच असते
एकटा कधी येतच नाही
सोबत त्याच्या स्फूर्ती येते;
लिहिता-लिहिता कविता सुचते
म्हणता-म्हणता गाणे होते
उत्साहाच्या भरात जे-जे
करू पाहतो ते-ते घडते...

उत्साहाच्या दिवसांमध्ये
कामाचाही शीण कसा तो वाटत नाही!
यादी करतो- 'हे करायचे, ते करायचे';
कितिही लिहिली तरिही यादी संपत नाही...

कधी कधी तर उत्साहाची नशाच येते!
निर्णय घेताना मग कसली फिकीर नसते
उत्साहाने जेव्हा-जेव्हा मी भरकटतो
कधीच कोणाचे मी काही ऐकत नसतो...

उत्साहाचे असेच असते
फार काळ तो टिकतच नाही!
भर ओसरल्यानंतर मग तो
नावालाही उरतच नाही...

उत्साहाचे असेच असते
नसतो तेव्हा रात्री अपुरी झोप
आणखी अंगावरती
सकाळ येते...
निघायलाही उशीर होतो
आणि हवाही ढगाळ येते...

उत्साहाचे असेच असते
नसतो तेव्हा कसल्या कविता, कसली गाणी?
तक्रारींचा सूर लागतो
बर्बाद जगाच्या रडण्यामध्ये
माझाही मी सूर मिसळतो...

उत्साहावर जेव्हा विरजण पडते तेव्हा
कसाबसा मी फार-फार तर स्वप्ने बघतो-
कर्जांचे हप्ते भरण्याची
तेही न चुकता वेळेवर!
त्यासाठी तर
कामाला जुंपून स्वतःला
सुरू ठेवतो
रोजच मरमर!...

उत्साहाचे असेच असते
जेव्हा असतो तेव्हा असतो;
जेव्हा नसतो तेव्हा नसतो...
असतो तेव्हा मी जगतो जगणे जगण्यासाठी
नसतो तेव्हा मी जगतो जगणे मरण्यासाठी....