तू कुठे होतास त्या काळात तेव्हा

ठरवुनी केलेस की झाले अचानक?
हा पसारा मांडण्याचे घोर पातक

तू कुठे होतास त्या काळात तेव्हा?
तूच का होतास अस्तित्वात तेव्हा?
तू कसा होतास, का होतास रे तू?
की तुझ्या असण्यात तिसऱ्याचाच हेतू?
पाहिजे होतास की होतास नाहक?
ठरवुनी केलेस की झाले अचानक?

मीलनापासून हे निर्माण झाले
की लढाईपासुनी जन्मास आले?
खेळणे किल्लीविना थंडावणारे
की तुझे हे स्वप्न आहे लांबणारे?
कल्पिले होतेस का इतके विदारक?
ठरवुनी केलेस की झाले अचानक?

स्फोट झाला ठीक पण झाला कशाचा?
काय आहे अर्थ तेजाचा, तमाचा?
का दहा आहेत सृष्टीला दिशा बस?
का मिती बस तीन, औषध काळ का बस?
सूर्य वाहक कोण पण सुर्यास चालक?
ठरवुनी केलेस की झाले अचानक?

केवढ्या आकाशगंगा, कृष्णविवरे
का, कसे, कोठे, किती हे विश्व पसरे?
मानवाची एकटी सृष्टी कशाला?
त्यातसुद्धा लोपली तुष्टी कशाला?
का इथे या वासना, का भूक दाहक?
ठरवुनी केलेस की झाले अचानक?

मानवी कक्षेत नाही काळ येथे
शंभरी पण त्यात जाळाजाळ येथे
इंद्रियांना ज्ञान नाही अंतरांचे
पण पिढ्यांचे रोज दावे एकरांचे
सूर भरकटलेत ज्यांचा तूच वादक
ठरवुनी केलेस की झाले अचानक?

दोन गोष्टी पाहिजे आहेत आता
मन नको, मेंदू नको झालेत आता
शक्य नसले तर हिशोबाला बसू चल
कोण खोटे वागले आधी बघू चल
ठरवुनी केलेस की झाले अचानक
सत्य सारे एकदा समजो भयानक