माणूस कितीही धैर्यवान असला तरी त्याच्या जीवनात एकादी अशी वेळ येते की त्यावेळी त्याचे धैर्य खूप प्रयत्न करुनही संकटावर मात करण्यास कमी पडते. एकादी वेळ अशीही येते की त्याचे प्रयत्न संकटावर मात करतात व तो त्या प्रयत्नात विजयी होतो. हे विजयी झाल्यावर मिळणारे समाधान याची किंमत जो त्या अरिष्टातून वाचलेला असतो त्यालाच कळते. अशाच एका जीवघेण्या अरिष्टातून वाचलेल्या शूर निखिलची ही कथा.
जीवनात लहानपणापासूनच सैनिकाचे जीवन जवळून पाहिलेला निखिल मिलिट्रीमध्ये कर्नल असलेल्या वडिलांचा एकुलता एक मुलगा. बुद्धीने तल्लख, कामसू, अभ्यासू असलेला निखिल म्हणता म्हणता दहावीची परीक्षा उत्तमरित्या पास झाला. त्यानंतर तो बेंगलोरच्या मिलिट्री ऍकॅडेमीत निवडला गेला. त्याचे वडील मिलिट्रीमधील मेडिकल कोअरमध्ये कर्नल होते. पण मुलाची आवड नेव्हल कोअरमध्ये होती. त्यामुळे तो तिकडे जाण्याचा हट्ट करत होता. वडिलांनी त्याच्या इच्छेआड न येण्याचे ठरवले. त्यामुळे निखिल नेव्हीच्या शिक्षणक्रमास हजर झाला. म्हणता म्हणता त्याने तो अभ्यासक्रम उत्तमरित्या पूर्ण केला व तो इंडियन नेव्हल आर्मीत ऑफिसर म्हणून रुजू झाला. त्याच्या हुशारीमुळे त्याला विशेष शिक्षण देऊन पाणबुडीवरील कामात रुजू करून घेतले गेले. यथावकाश त्याचे मिलिट्रीमधीलच एका ऑफिसरच्या मुलीवर प्रेम बसले. ती पंजाबी होती. पण सैन्यात जातीयतेला थारा नसतो. त्यामुळे लवकरच ते विवाहबद्ध झाले. त्याचे पोस्टिंग मुंबई येथे झाले होते. लवकरच त्याला मुलगा झाला.
कांही दिवस असे मजेत गेल्यावर निखिलला ऍडव्हान्स ट्रेनिगंग साठी विशखापट्टण येथे आर महिने जावे लागले. या चार महिन्यात मुलाचे दर्शन होणार नसल्याने तो व्याकूळ झाला होता. पण काय करणार? नोकरीपुढे इलाज नव्हता. याअ दरम्यान दिवाळीचा सण येत असल्याने कमीत कमी दिवाळीला तरी मी येईन असे त्याने पत्नीला सांगून त्यांची रजा घेतली. ठरल्याप्रमाणे तो दिवाळीस आला पण त्याच्या हातापायाला बँडेज होते. ते पाहून पत्नी अतिशय घाबरली तीने त्याला खोदून खोदून विचारल्यावर त्याने सांगण्यास सुरवात केली.
"आम्ही सर्व ट्रेनिंग घेणारे ऑफिसर रोज किनाऱया वरून लहान बोटीत बसून आमच्या पाणबुडीत जात होतो. एका होडीत दोन जण बसतात. त्याप्रमाणे मी इकडे येण्याचे अगोदर आठ दिवस माझ्या एका मित्रासोबत लहान नावेत बसलो होतो. ती नाव वल्हवत वल्हवत निघालो असता समुद्रातील एका मोठ्या लाटेने नावेला पलटवली. आम्ही दोघे समुद्रात पडलो. आम्हांला पोहता येत असल्याने तसे काळजीचे कारण नव्हते. त्या नावेला मी व मित्राने परत सरळ केले. तो मित्र नावेत चढला. मी नावेत चढत असताना माझा पाय अडकला असल्या सारखा वाटला. माझ्या पायाला एका जेलीफिशने विळखा घातला होता. त्या फिशच्या तावडीतून सुटणे केवळ अशक्यच वाटत होते. मी खूप प्रयत्न केला. त्याच्या नांग्याना तोडून टाकत होतो तसा तो अधिक चवताळला होता. माझ्या पायाची आग होऊ लागली. मी वाचेन असे मला वाटत नव्हते. पण मित्राने मदतीस येऊन त्या फिशला चाकूने वेगळे केले व माझी सुटका केली. मग आम्ही बोटीवर कसेबसे चढलो. मला तर ग्लानी येत होती. माझ्या अंगात जेलीफिशचे विष भिनत चालले होते. मित्राने ही सर्व हकिकत वरीष्ठ अधिकाऱ्याना सांगितली. अधिकाऱ्यानी मला लगेच हॉस्पिटलमध्ये पाठवले. हॉस्पिटलमधील डॉक्टरने हकिकत विचारून योग्य ते उपचार सुरू केले. त्यानी सांगितले की थोडा उशीर झाला असता तर त्या जेलफिशचे विष अंगात भिनले असते व मग वाचवणे कठीण झाले असते. आता औषध घेऊन विश्रांती घ्यावयास पाहिजे. चार दिवस विश्रांती घेऊन मी मोठ्या कष्टाने येथे आलो आहे. मला उद्याच परत जावे लागेल."
ही हकिकत ऐकून पत्नीला रडूच आले. त्याचा पुनर्जन्मच झाला होता. पत्नीचे प्रेम व मुलाची ओढ यानी त्याला मृत्युच्या दाढेतून खेचून आणले होते. जीवनातील फार मोठे अरिष्ट अशा तऱ्हेने टळले होते. ती दिवाळी त्यांच्या कायमची कषात राहणार होती.