कविवर्य ना. वा. टिळकांची शब्दसृष्टी!

नारायण वामन टिळक (१८६५ -१९१९) हे आधुनिक मराठी कवींच्या पहिल्या पिढीपैकी! केशवसुतांच्याही आधी त्यांनी काव्यलेखनास आरांभ केला होता. त्यांच्या कवितांमधून ईशभक्ती,देशभक्ती, आणि समाजाविषयीची कळकळ ओथंबताना दिसते. किंबहूना या साऱ्यांमध्ये त्यांना अभेदच दिसतो. याहूनही महत्त्वाचे दिसते ते म्हणजे त्यांची कुटुंब-जीवनाबद्दलची ओढ! कधी ते बापा बद्दल लिहतील तर कधी भगिनीबद्दल! कधी पत्नीबद्दाल तर कधी लेकरांबद्दल! प्रत्येकवेळी त्यांची परिवाराबद्दलची आर्तताच प्रगटताना दिसते.

'सुशीला' या काव्यातल्या या ओळी पहा-

गृहा आली ती सुंदरी सुशीला/किती वर्णू जो हर्ष तिला झाला/

हृदय तीचे ते असे हो स्त्रियेचे/ तसे माझे नच साच पूरुषाचे/

जरी कवयत्री कुणी हे करील / प्रेमहर्षाला तिच्या रंगवील/

तरी काढील ती चित्र नामी/ प्रतितीसम कल्पना न ये कामी!

बापाभावांना हर्ष फार झाला/ मायबहिणींना प्रेमपूर आला/

सहा महिन्यांनी लाडकी सुशीला/ परत आलेली पाहून गृहाला/

घरामध्ये पाहून त्या मुलीते / कामधंदा विसरूनी जाय जे ते/

किती वाट्याला येई ती कुणाच्या/ किती आईच्या! किती ताइ-माई यांच्या

रात्र सारी गोष्टीत सरूनी गेली/ तया वाटे ती आज अल्प झाली/

उद्या-परवांचे आज हो जहाले! कधी न घडे ते नवल घडूनी आले/

साध्या सोप्या भाषेत त्यांनी संपूर्ण परिवाराचे अतिशय उत्तम चित्र रंगवले आहे. हेच परिवारासंबंधातले प्रेम त्यांच्या अनेक कवितातून दिसते. 

इथे निवडलेल्या वेच्यात नक्कीच सोपेपणा आहे. पण टिळकांची एकूणच भाषा अतिशय संस्कृत-प्रचूर आहे. त्यांचे संस्कृतवरचे प्रभूत्व असामान्य होते. आणि याच जोरावर ते अनेक अर्थवाही शब्द लीलया घडवित असत. हे शब्द सुरवातीस खूपच कठीण वाटतात. पण एकदा का त्यांचे अर्थ कळले की त्यातील सौंदर्य ही उमगते आणि आपण आश्चर्यचकित होतो. त्या शब्दांचीही भुरळ पडते.

मी इथे त्यांच्या विविध कवितेत मला सापडलेले, (सहसा इतरत्र न आढळणारे) असे काही अर्थवाही शब्द देत आहे. 'मनोगत'च्या वाचकांना देखील ते आवडतील असा भरावसा वाटतो.

१. रसज्ञ (रसिक)      २. युग्मक (जोडी )     ३. प्रेमौघ (प्रेमाचा प्रवाह)     ५. निगूढ (जे गूढ नाही ते- सहज समजणारे)  

६. अली (भुंगा)      ७. कवीश (कवी अधिक ईश) (कवींचा ईश्वर)     ८‌. शर्व (शंकर)   ९. वल्लरी (वेल)     १०. कासार (तलाव)     ११. हृत्कासार (हृदयरूपी तलाव)     १२. पिक (कोकिळा)     १२. केकी(मोर)     १३‌. सुम (फूल)   

१५. क्षीणोपाय ( निरूपाय)     १६. बलकर (शक्तिवर्धक)     १७. द्विजराय (पक्षी)     १८. कुतुक (कौतुक)     १९. प्रसून (फूल)     २०. वत्सर(वर्ष)     २१‌. सारल्य (सरळपणा)     २२. रदनावली (दंतपंक्ती)     २३. सरोष (रोषासहित-रागाने)  

२४. घनांबू  (ढगातून पडलेला थेंब)         २५. उपायन (भेट वस्तू)

असे अन्य कितीतरी! इथे फक्त वानगी दाखल दिले आहेत. टिळकांच्या कविता या छंदोबद्ध (अक्षरगण/मात्रा बद्ध ) आहेत. त्या गण-मात्रांचे बंधन पाळताना त्यांना शब्दांची कधीच वाण पडत नसे. नवे शब्द ते सहजरित्या घडवताना दिसतात.

रसिकांनी त्यांच्या मूळ कविताच पहाव्यात!