सगळे अमेरिकन आता हिंदू आहेत...

परवा न्यूजवीक का कुठल्यातरी मासिकामध्ये हा लेख वाचण्यात आला. लेखाचे शिर्षक "ऑल अमेरिकन्स आर नाउ हिंदूस" अस काहीतरी होतं.  लेखाचा सारांश इथे देत आहे. "तसं पाहिलं तर ७५% अमेरिकन लोक हे खर तर अधिकृतपणे ख्रिश्चन आहेत. पण देव ह्या संकल्पनेकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन हा आता पूर्णपणे बदलून हिंदूंसारखा झालाय. म्हणजे पूर्वी जिझस हाच देव, जिझस हेच सत्य अशी ख्रिश्चन धर्माची व चर्चची शिकवण होती, म्हणजे अजूनही ती तशीच आहे, फक्त लोकांचा त्यावर विश्वास उडालाय. त्याउलट, हिंदू धर्माची शिकवण, की देव जरी एकच असला तरी त्याकडे पोचण्याचे मार्ग विविध आहेत, ह्यावर अमेरिकन लोक हल्ली विश्वास ठेवतात. एका परीक्षणाच्या आधारे, जवळ जवळ सगळे अमेरिकन लोक स्वतःला धार्मिक समजत नाहीत पण अध्यात्मिक समजतात (त्यांच्या मते, दे आर नॉट रिलिजिअस बट स्पिरिच्युअल). पूर्वी अमेरिकन लोक अध्यात्मिक उन्नतीसाठी/मार्गदर्शनासाठी फक्त चर्च मध्ये जायचे, चर्चवरच अवलंबून होते; पण आता ते इतर मार्गांचाही अवलंब करतात, उदा. योगा, ध्यान वगैरे." इत्यादि.

माझ्यादृष्टिने हा खूप मोठा बदल आहे आणि जो नक्कीच खूप चांगला आहे. विशेषतः पर्वा वाचलेल्या एका मेलच्या पार्श्वभूमीवर. काहीदिवसांपूर्वी एक मेल आला होता. की, "संस्कृती टिकून रहायला किंवा वाढायला कमीत कमी २.१ एवढा फर्टिलिटी रेट आवश्यक आहे. अमेरिका, युरोप, कॅनडा इ. सर्व पुढारलेल्या देशात हा १.३ ते १.८ च्या घरात आहे. थोडक्यात काय ह्या पुढारलेल्या देशांच्या संस्कृतीचा ऱ्हास होतोय. तरीपण त्यांची लोकसंख्या वाढते आहे. कशामुळे, इमिग्रेशन. मुस्लिम इमिग्रेशन. जर्मनीनि म्हणे अधिकृतरित्या जाहिर केलय की २०५० पर्यंत जर्मनी हा मुस्लिम देश असेल." वगैरे. शेवटी हे सगळं स्टॅटिस्टिक्स आहे आणि त्यावर पूर्णपणे विश्वास ठेवणं अवघड आहे. तरीपण, इस्लामचा हा प्रसार इतरांसाठी नक्कीच घातक आहे. कुठलाही धर्म हा मुळात वाईट नसला तरी त्याची अशी विचित्र वाढ ही नक्कीच चिंतेची बाब ठरते.