वाजवित घुंगरांचा गोड झंकार
चेहऱ्यावर भावनांचा अविष्कार
देहाचा कमनीय सुंदर आकार
ठुमकत आली ही मोहक नार
विलसते मधुर हास्य हे ओठात
साद घालते डोळ्याने खुणात
घेते हात हा, आपुल्या हातात
हात दाबुनी किंचित गाणे गात
घेते फिरकी गरकन हो नृत्यात
जशी चमकावी बिजली अंगात
लवचिक बांधा नाचतो डौलात
भुरळ पडे टिपण्यास ते मनात
दिसते ती सुंदर भरजरी शालूत
अंगावरील सुंदरशा आभुषणात
माळला तो शुभ्र गजरा केसात
दिसते मोरणी नाकात झोकात
तान मधुर गाण्याची गळ्यात
रुतते जाऊनी खोलशी मनात
विसरे दुःख माझे दोन क्षणात
विरंगुळा मजला हा दु:खात