काय बाई सांगू, कसे ग सांगू
गेले होते मी लग्नास आज, तेथे होती बुफे पार्टी खास
काय बाई घेऊ, किती ग घेऊ
मलाच वाटे माझी लाज, सारे पाहती मलाच खास
लाडू दिसती, खूपच सुंदर
बदामशिऱ्याचा असे शेजार
गुलाबजामून करी बेजार
पाहुनी सुटे जिभेला लाळ, मलाच वाटे माझी लाज
वास खमंग येई भज्यांचा
घमघमाट सुटे बिर्याणीचा
साज आगळा पुरीभाजीचा
चाखुनी वाटे पाहावे आज, मलाच वाटे माझी लाज
हात जगन्नाथ असे आपुला
भरपूर घ्यावेत पदार्थाला
जागा थाळीत नसे ठेवायला
रोखून बघती सारे मज, मलाच वाटे माझी लाज
बघते मी दुसऱ्यांची ताटे
कोंबती पदार्थ दाटे दाटे
संपताच जाती रांगेच्या वाटे
असे हा बुफे पार्टीचा बाज,मलाच वाटे माझीच लाज
असे ताट डाव्या हातात
उभे राहती ते कोपऱ्यात
ढकलती ते अन्नास घशात
माया नसे जेवणात खास, मलाच वाटे माझी लाज
संपला असे कसा जिव्हाळा
नसे कुणास कुणाचा उमाळा
सांभाळती ते आपुल्या वेळा
उपचार पुरा करती आज, मलाच वाटे माझी लाज
आठवते मज आमुची पंगत
येत असे त्यात किती रंगत
जेवणात चाले खूपच गंमत
नवदांपत्याची करीत संगत, घेती तोंडी हासत घास