एका घरात होत्या बाया कजाग दोन

आमचे प्रेरणास्थान : एका तळ्यात होती बदके पिले सुरेख.
आमच्या प्रेरणास्थानाचे प्रेरणास्थान : दुवा क्र. १

एका घरात होत्या बाया कजाग दोन
होता पुरूष तिथला धारून फक्त मौन

कारण लहानसेही भांडावयास चाले
आई व बायकोचा नेहमीच वाद चाले
दोघी तयास टोची, दिसतो हताश, दीन
होता पुरूष तिथला धारून फक्त मौन

पुरुषास दु:ख भारी, भोळा रडे स्वत:शी
पोरेहि ना विचारी, सांगेल तो कुणाशी
कर्तेपदास त्याच्या देती मुळी न मान
होता पुरूष तिथला धारून फक्त मौन

एके दिनी परंतु पुरुषास त्या कळाले
संकोच, लाज सारे वार्‍यासवे पळाले
चाले घराघरातुन डिट्टो असाच सीन
त्याचेच त्या कळाले सारे पती समान...