शहराच्या उत्तरेला अखेरच्या वळणावर तिचा पांढरा शुभ्र बंगला उभा असायचा. शाळेला वळसा घालून चढण सुरू झालं की दुरूनच दिसायचा. सकाळच्या वेळी पाठीवर अकाश घेतलेल्या त्या बंगल्याचं मला तेंव्हापासूंचं आकर्षण. आसपासच्या माळरानावरून तो अलगद उचललेल्या मेघासारखा भासायचा.
बाजूला राहणाऱ्या मन्याच्या बंगल्यात आम्ही खेळायला जायचो. खरंतर मला मन्या बिलकुल आवडायचा नाही, स्वतःच्या मोठ्या घराचा आणि अंगणाचा त्याला खूप गर्व होता आणि त्याच्याकडे येणाऱ्या मुलांना तो ह्याची पूर्ण जाणीव करून देत असे. तरीही मी त्याच्याकडे जात असे. त्याच्या कुंपणातून त्या बंगल्याची भिंत, एका कोनातून दिसायची. कधी कधी त्या भिंतीवर रांगोळी काढलेली असे, पण आई काढते तशी ठिपक्या ठिपक्यांची नाही, तर संपूर्ण रेषांची, स्पष्ट आकारांची. पण त्या कोनातून ते आकार समजत नव्हते, नजरेत भरायचे ते फक्त रंग. ते प्रसन्न रंग बघत आणि तिची रांगोळी भिंतीवरून ओघळत कशी नाही? असा विचार करत मी कितीतरी वेळ तिथेच उभा रहायचो. त्यामुळे लपाछपीमध्ये मीच आधी बाद व्हायचो आणि माझ्यावर राज्य आलं की बाकीच्याना शोधताना माझा बराच वेळ जायचा.
एकदा मन्याच्या घराकडे जात असताना मला ती दिसली, हातात ब्रश आणि पॅलेट घेऊन ती अंगणात उभी होती. मी समोरच्या भिंतीकडे पाहिलं आणि मला न ओघळणाऱ्या रांगोळीचं रहस्य अचानक उमजलं. मी थोडं पुढं जाऊन कुंपणा आडून गुपचुप भिंतिकडे पाहत राहीलो. ती भिंत एक ओढा झाली होती, आणि ओढ्यावर गुलाबी-पांढऱ्या पक्षांची एकच गर्दी. पक्षांच्या गर्दीत मधूनच आकाशातल्या ढगांचं प्रतिबिंब डोकावत होतं. काही पक्षी पाण्यात चोच घालून मासे पकडत होते, तर काही उगाच एकडून तिकडे उडत होते. त्यांत एक इवलासं, गडद गुलाबी पिल्लू एका खडकावरून झेप घेण्याच्या पवित्र्यात उभं होतं. मी थोडावेळ त्याच्या उडण्याची वाट पाहिली पण ते तर तसचं उभं. अचानक मी भानावर आलो, ती ही अजून तशीच उभी होती, चित्राकडे पाहत. मी पटकन मागे वळलो, किती वेळ मी तिथेच उभा होतो लक्षातच येइना. मन्याच्या अंगणात शिरलो तर सगळे खेळून परत चालले होते. एक तास.. एक तास मी तिकडे उभा होतो, वेड्यासारखा भिंतीकडे बघत, चित्रातल्या पिल्लाच्या उडण्याची वाट पाहत.
आठवडाभर माझ्या मनात सारखा चित्राचाच विचार चालू होता. मन्याला बरं नव्हतं तर त्याच्या घरी जायचा प्रसंगसुद्धा येत नव्हता. मग मी एक दिवस काही कारण नसताना तिच्या बंगल्याजवळ गेलो. आज ओढ्याची जागा एका उंच ईमारतीनी घेतली होती. काचेच्या खिडक्यांची ती ईमारत उन्हामध्ये चकाकत होती, एका उघड्या खिडकीतून एक माणूस बाहेर बघत होता. ईमारतीवर कुठेही पाहीलं तरी नजर वर वर खेचली जाऊन घुमटावर स्थिरावत होती. आज ती नेहेमीची भिंत देखील खूप उंच वाटत होती. मी इकडे तिकडे पाहिलं पण ईमारतीची मालकीण आज जवळ उभी नव्हती, एक शेवटची नजर फिरवून, ईमारत डोळ्यात साठवत मी परत फिरलो. दुसऱ्या दिवशी जाऊन बघितलं तर भिंत मोकळी, पांधरी शुभ्र. मी अशा अनेक फेऱ्या मारल्या नवीन चित्र बघण्याच्या आशेवर एक दिवस माझ्या लक्ष्यात आलं की शाळेच्या गच्चीवरून बंगल्याकडे नीट पाहिलं तर भिंतीच्या रंगात पडलेला फरक लक्षात यायचा. मग मी रोज शाळेच्या गच्चीत जाऊन बघू लागलो आणि माझा नंतरचा कार्यक्रम आपोआप ठरला जायचा.
असाच एक दिवस बदलेले रंग बघून मी तिच्या बंगल्यावर गेलो. उन्हाळ्यात, दुपारी, शाळा सुटल्यावर, घामाने निथळत कुंपणापर्यंत पोचलो, तर आज भिंतीवर सायंकाळ पसरली होती. सूर्य मावळला होता, पण ढगांमध्ये गुंतलेले काही किरण अजूनही रे̱गाळत, पर्वत माथ्यांवर बरसत होते. सगळ्यात जवळ असलेल्या पर्वताचं शिखर पाहिलं तर एक मुलगी बसली आहे असा भास होत होता. संपूर्ण काळोखलेल्या पर्वतावर फक्त तिच्या चेहेऱ्यावर सोनेरी पिवळा प्रकाश पडला होता आणि कातळाचं शरीर असलेली ती, खूपच नाजूक. तिला एकटीला, पर्वताची भीती कशी वाटत नव्हती?सूर्याला निरोप द्यायला एव्हड्या वर आलेली ती कोण असेल?
"गिरीजा!!"
मी दचकून मागे बघितलं. ती माझ्या मागेच उभी होती. किती वेळ? तिला कसं कळलं मी काय विचार करत आहे? मग मला माझ्या अवस्थेची जाणीव झाली. मी तिच्या घाराबाहेरील कुंपणाजवळ उभा राहून चोरून आत बघत असताना तिनं मला पाहिलं होतं. मी तिकडून पळतच निघालो, तिच्या जवळून जात असताना ती गालातल्या गालात हसली, असं नंतर नेहेमी वाटत रहिलं. त्या रात्री मी एकटाच अंगणात खाटेवर पडून रहिलो. ती आज पहिल्यांदा माझ्याशी बोलली होती आणि आज मी तिला प्रथमच इतक्या जवळून पाहिलं होतं. नितळ डोळ्यांची, अर्धवट बांधलेल्या, विस्कटलेल्या केसांची, ती चित्रांची मालकीण खूपच मोहक होती, अगदी तिच्या चित्रातलीच एक. मला माझ्या बावळटपणाचा खूपच राग आला, मी बावरून तिच्याशी एकही शब्द न बोलता पळत आलो होतो. तिचं काय मत झालं असेल माझ्याबद्दलं? एक छोटा, लाजरा मुलगा? बराच वेळ मला ह्या विचारानी झोपच येत नव्हती. मग पुढच्यावेळी भेटल्यावर काहीतरी छानसं, मोठ्या माणसांसारखं समजूतदारपणे बोलायचं असं ठरवलेल्यावर कुठे मला झोप लागली. पण झोपेतही तिचा आणि चित्रातल्या गिरीजाचा चेहेरा येऊन एकमेकांमध्ये मिसळत राहीला. पहिल्यांदा मला कुणी अवढं आवडलं होतं. मनाचा गोंधळ उडाला होता.
बरेच दिवस मग मला घराजवळून चित्र बघायची हिम्मत झाली नाही. भिंतीवरचे रंग बदलेले कीच फक्त मी मन्याच्या घरी खेळायला जाऊ लागलो, माझ्या कधी कधीच येण्यावर केलेली त्यांची कुचेष्टाही सहन करत. त्यांना निमूटपणे राज्य घेणारा भिडू मिळायचा आणि मला बिनधास्तपणे चित्रातले रंग पाहता येत म्हणून. एक दिवस ती चित्र काढत असलेली दिसली, अगदीच राहवलं नाही म्हणून पकडल्या जाण्याची भीती वाटत असूनही मी माझ्या नेहेमीच्या जागेवर जाऊन, कुंपणाआडून आत बघत होतो. तिनी नुकतीच सुरवात केली होती. मला फक्त तिचे हवेच्या झुळकेबरोबर हलणारे केस आणि अलगद, हळुवार भिंतीवरून फिरणारा हात दिसत होता. ती थोडा वेळ थांबली, मग अचानक उठून कुंपणाजवळ आली, माझ्याकडे बघून खळीदार हसली आणि फाटक उघडून परत जाऊन बसली. मीही तिच्या मागून चालत जाऊन तिच्या आणि चित्राजवळ जाऊन बसलो, कधी चित्राकडे बघत तर कधी तिच्याकडे. चित्रात चुलीवर गरम होणारं भांड उतरत होतं आणि त्या चुलीचा प्रकाशच जणू गिरीजाच्या चेहेऱ्यावर पसरत होता. चित्र काढताना ति कधी मधेच थांबायची, डोळे विस्फारायची, कधी स्वतःवरच खूश व्हायची तर कधी अस्वस्थ झाली तर शांत करायला दीर्घ श्वास घ्यायची. मी मात्र तिच्या हालचाली, तिचे हावभाव आणि त्यांचा, तयार होणाऱ्या चित्रावर पडत असलेला प्रभाव श्वास रोखून बघत होतो. पण तिचं माझ्याकडे लक्षच नव्हतं, जस काही मीही एक चित्रच होतो, तिनी रंगवायला घेतलेलं. चित्र काढून झालं; आजी आपल्या छोट्या नातीला चुलीवर भाकरी करून वाढत होती. भाकरी परतायला पुढे वाकलेल्या आजीचा चेहेरा आणि तिचे चंदेरी केस चुलीच्या प्रकाशात उजळून निघाले होते. आम्ही थोडं मागे झालो, आता शेजारी बसलेली लहान मुलगी आमच्याकडे बघून हसत होती. खेळून मळलेला फ्रौक, हातात छोट्या छोट्या बांगड्या, नितळ डोळे, गालावर खळी. मी पटकन वळून पाहिलं तर तिनेही लहान मुलीवरची नजर काढून माझ्याकडे बघितलं. "गिरीजा" यावेळी मी म्हणालो, आणि गोंधळण्याची वेळ तिच्यावर आली होती. क्षणभर तिनं माझ्याकडे नवलानं पाहिलं आणि मग पुन्हा एकदा खळीदार हसून हळुहळू मान डोलवली... "हो, गिरीजाच". मग कितीतरी वेळ आम्ही चित्राजवळ बसून होतो, दिवस मावळून आजीची चूल विझेपर्यंत. काय बोलत होतो, बोलत होतो की नाही हे आता आठवत नाही, पण गिरीजा, ती संध्याकाळ आणि आजी अजूनही माझ्या मनावर तशाच कोरलेल्या आहेत. त्या दिवशी मी ठरवलेल्या प्रमाणे मोठ्या माणसांसारखी एकही गोष्ट केली नाही, तिचं नावही विचारायला विसरलो. पण आता त्याची गरजच उरली नव्हती, ती माझ्यासाठी गिरीजाच झाली होती आणि ती गिरीजा फक्त माझ्यासाठीच होती.