कनात

अपमान सोसून, दु:खाने अश्रू गाळून;

आत्मविवंचना मी किती करित राहिले;

जगणं नकोसच केलंस माझं तरी;

तुझ्या सारख्या नवऱ्यात प्रेम शोधत राहिले.

नवरा म्हणजे काय कुणी विचारलं तर मला आठवते;

तुझी जबरदस्ती, तुझे आरोप, तुझं झिडकारणं;

अन शेवटी माझं तुझ्या आयुष्यातलं अस्तित्व नाकारणं;

वापरून फक्त एक कागदाचा चिटोरा.

आता आठवला तो भूतकाळ जरी;

समजत जात मला आपल्यात प्रेम कधीच नव्हतं;

अन विश्वासच बसत नाही माझा;

की मी तुला कधी परमेश्वर मानलं होतं.

माझं अजूनही तुझ्यावर प्रेम आहे असं वाटत मला;

का? माझ्या अस्तित्वात तू आहेस म्हणून?

का माझ्या मुलांचा बाप आहेस म्हणून?

किंवा माझ्या तुटलेल्या संसाराची कनात(? ) आहेस म्हणून.

गळ्यात मी मंगळसूत्र अजूनही घालते;

कारण समाजात एकट्या बाईला बरेच पुरुष असतात;

अन त्यातल्याच एक असलेल्या तुझी बायको असल्याची;

संरक्षक भिंत मग माझ्यासारख्या परित्यक्तेभवती उभी राहते.

मी आतासुद्धा एकटिच पडले;

अगदी तुझ्या बरोबर असताना पडायचे तशी;

लोक म्हणतात नशिबाचे भोग, भोगायचेच;

म्हणून तर मि शांत आहे; तुझी शिक्षा काय हे न विचारता.