दही पोहे

  • पोहे - माणशी साधारणतः एक मुठ पोहे (अंदाजासाठी)
  • वाटीभर गोड घट्ट दही, साय
  • फोडणीचे साहित्यः डावभर तेल, मोहरी, जिरे, कुटाची (तळणाची) मिरची, कढीलिंब व हिंग
  • २ लाल सुक्या मिरच्या
  • बारीक चिरलेली हिरवी मिरची
  • साखर चवीप्रमाणे
  • मीठ चवीप्रमाणे
  • व बारीक चिरलेली कोथिंबीर
५ मिनिटे
माणशी पोह्यांची एक मुठ धरावी.

सर्वप्रथम घट्ट दही घेऊन त्यात चवीनुसार साखर, मीठ, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या नीट कालवून घ्याव्यात. त्यात आयत्यावेळी पोहे न भिजवता घालावेत म्हणजे एकदम गच्च गोळा होत नाहीत. पोहे नीट कालवून मग हिंग लाल मिरची कढीलिंब घालून चुरचुरीत फोडणी करावी. त्यात कुटाची तळणाची मिरची ही तळून कुस्करावी आणि ती फोडणी पोह्यांवर ओतावी.

परत नीट कालवून हवे असल्यास वा घट्ट वाटल्यास थोडे दही घालावे सायही घालू शकता आणि कोथिंबीर घालून बाऊल मध्ये सजवावेत आणि यथेच्छ आस्वाद घ्यावा.  

याच प्रमणे कालवलेला दहीभात ही चांगला लागतो. माझी आई रात्रीच्या जेवणात  तेलकट मसालेदार काही खाल्लं की दहीभात करते, त्यात मऊ साय आणि दुध घालून. विशेषतः पावभाजी, बटाटावडे वगैरे खाल्ल्यावर थोडासा दहीभात कालवलेला असायचाच.
तो खाऊन पाणी प्यायल्यावर मग तहान तहान न झाल्याने  अतीव समाधान वाटत असे.
तसेच मुलं वगैरे खेळून आल्यावर भूक लागली म्हणजे पटकन खायला दहीपोहे करत असे. यात कुटाची मिरची तळून कुस्करून घातली की फारच सुंदर चव येते. सोबत मिरगुंड किंवा पोहा पापड असतील तर लाजवाब!!!

- (खवय्यी) पल्लवी

सौ. आई.