साता समुद्रापार झेप घेताना...

'अमेरिका' या नावाबद्दल आपल्याकडे एकंदरीतच आकर्षणं आहे. लग्नाला उपवर मुलगा जर अमेरिकेला जाऊन आलेला अथवा राहत असलेला असेल, तर वरमायेचा 'भाव' चांगलाच वधारतो. त्यामुळे बऱ्याचदा या देशाचा उपयोग लोक 'शिक्षण' म्हणून ही करतात... म्हणजे, 'यू. एस. रिटर्न' म्हटलं की, बऱ्याच गोष्टी झाकल्या जातात!

माझा जन्म मुळात अशा कुटुंबात झाला आहे की, भारत देशाबद्दल प्रेम, आदर आणि आस्था हेच मला मिळालेलं बाळकडू. देशासाठीच जगायचा आणि देशासाठीच... ... ... काम करायचं ('मरण्याचा विचार हाच अविचार' हे दुसरं बाळकडू!), हे आमचं ब्रीद. त्यामुळे इथली संस्कृती, सभ्यता, समाज, आप्तस्वकीय यांना सोडून आपण इतरत्र राहू, हा मनात न डोकावणारा विचार होता. पण पुढे नशिबाने अशी काही पानं उलटली की, माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पाऊल पडलं. हे क्षेत्रच मुळात संधी उपलब्ध करून देणारं! त्यामुळे पहिली संधी आली ती पदव्युत्तर शिक्षणाची...
पटनी आणि बिट्स, पिलानी यांच्या संयुक्त माध्यमातून 'एम. एस.' होणं, म्हणजे एक पंचवार्षिक योजना ठरली. ती पूर्ण करण्यात अभ्यास, एकाग्रता असल्या फुटकळ बाबींपेक्षा जिद्द, चिकाटी अशा बाबींनी अधिक हातभार लावला. 'एम. एस.' पूर्ण व्हायला दीड वर्ष शिल्लक असतानाच मला 'ओन्साइट'चे वेध लागले. पुढे पुढे जसं जसं 'एम. एस.' पूर्णत्वाला यायला लागलं, तसंतसं तर मला 'ओन्साइट'चं वेड ही लागायला लागलं होतं.
सर्वप्रथम बक्कळ पैसा आणि दुय्यम म्हणजे अनुभव या दोन गोष्टींसाठी मी माझ्या सर्व जवळच्या व्यक्तींचा सहवास सोडून साता समुद्रापार झेप घेण्याचा निर्णय घेतला होता... किंवा त्यासाठी उतावळा झालो होतो. आपण स्वजनांपासून सलग इतका काल इतके दूर राहू शकू का, हा एक प्रश्न होता. स्वत: मागे लागून गावलेल्या 'ओन्साइट'च्या मध्यातून परतणं अशक्य आहे, या गोष्टीची जाणीव होत होती. पण, एक लांब उडी मारण्यापूर्वी थोडं मागे व्हावंच लागतं..., अशी एक समजूत मन मला घालून देत होतं.
त्यामुळे भारताबाहेर जाण्याचा निर्धार माझ्या ठिकाणी पक्का झाल्यावर मी तो वास्तवात आणण्याच्या कामी लागलो. सुमारे चार-पाच महिन्यांच्या त्या प्रयत्नांबद्दल लिहायचं, तर वेगळ्या शीर्षकाने एक अखंड लेख लिहिता येईल आणि ऑफिसमध्ये या काळात खेळलेल्या राजकारणाचा आलेख मांडावा लागेल. आलेख मांडण्यात वावगं काहीच नाही; पण त्याच्याशी संबंधीत असलेल्या कोणाचंही माझ्याबद्दलचं चांगलं मत तो (आ)लेख वाचून आता बदलू नये, ही एक नम्र इच्छा!
थोडक्यात, १ फेब्रुवारी २००९ ला मी पुण्यभूमी सोडली आणि पुन्हा जन्मभूमी मुंबई कडे वळलो. मुंबईंतलं दीड महिन्याचं अनपेक्षितपणे सुखद गेलेलं वास्तव्य हा अमेरिका योगाचा पाया होता. ऑफिसची बससेवा असल्यामुळे लोकलच्या गर्दीला शिव्या घालण्याचा प्रश्न येत नव्हता आणि फेब्रुवारी अखेरीपर्यंत मुंबईत घाम येत नव्हता. त्यामुळे हे वास्तव्य सुखद होतं आणि याच कारणांमुळे अनपेक्षितही!
फेब्रुवारीच्या अखेरीसच मला कल्पना देण्यात आली होती की, १४ मार्चच्या रात्री उशीरा निघावं लागणार. त्या दृष्टीने तयारी सुरू झाली. परंतु इतरांच्या उदाहरणांवरून तिकिटे हाती येईपर्यंत काहीच निश्चिती नसल्याचं मनात पक्कं होतं. प्रत्येक दिवस प्रवासाच्या दृष्टीने एक-एक पाऊल पुढे जात होतं. पण, या सर्व गोष्टींचीं चाहूलही फारशी कोणाला नव्हती. धूलिवंदनाच्या दिवशी या गोष्टीची कल्पना नातेवाईक आणि जवळच्या मित्रांमध्ये दिली आणि त्यांचा 'एवढ्या उशीरा सांगितल्याबद्दल' रोष ओढवून घेतला. आता हा रोषही प्रेमोत्पन्नच होता, हे उघडपणे सांगण्याची काहीएक गरज नाही... (पण आता सांगून झालंय!)
सर्वांनी केलेल्या अतोनात कौतुकामुळे माझं अमेरिकेबद्दलचं कुतूहल वाढत होतं आणि पर्यायाने वाढत होती, ती जबाबदारी... गोऱ्यांच्या देशात यश मिळवण्याची! 'मी अमेरिकेला जाणार' याचं सर्वांना असलेलं अप्रूप पाहून मला आश्चर्य वाटत होतं, ते पु.लं.च्या बघुनानांचं... "अमेरिकेत काय! हल्ली पट्टेवालेसुद्धा जातात!" हा मधल्या आळीचं नाव सार्थ करत मारलेला शेरा अगदीच विसंगत वाटत होता... (संदर्भ कथा: म्हैस) तर इतकं कौतुक होत होतं... आशीर्वाद मिळत होते... प्रेम मिळत होतं...
प्रवासापूर्वीचे दोन दिवसा जसे फोनवर बोलण्यात गेले, तसे ते भरलेल्या बॅगा पुन्हा-पुन्हा उचकटण्यात आणि भरण्यात गेले. सोबत नेण्याच्या वजनावर घातलेले निर्बंध फारच जाचक वाटत होते. पण पर्याय नव्हता...
मित्रमंडळींपैकी 'भावना' मला विमानतळावर सोडायला येणार होती. पण ती घरी वेळेपूर्वी पोहोचली आणि तिच्याबरोबर अनपेक्षितपणे आलेल्या मंदार आणि आदित्य यांना पाहून सुखद धक्का बसला. त्या तिघांची उपस्थिती सर्वार्थाने आनंद देणारी होती. निघण्यापूर्वीचं घरातलं वातावरण हलकं ठेवण्यात त्यांनी सिंहाचा वाटा उचलला. पुण्याहून मला निरोप द्यायला आलेल्या मित्रांच्या प्रेमाच्या ऋणात राहणंच, मी पसंत करीन. इतरही मित्र-नातलगांनी प्रत्यक्ष भेटून अथवा फोनवर संपर्क साधून शुभेच्छा - आशीर्वाद सोबत दिलेच होते. उज्ज्वला ताई अमृता - सम्राज्ञीला घेऊन भेटायला आली होती. गोळे सर आणि काकूसुद्धा पुष्पगुच्छ घेऊन आले होते. या सगळ्याचं ओझं समर्थपणे पेलण्याचं बळ माझ्या पंखांना द्या, असं म्हणत आई-बाबा आणि देवाच्या पाया पडलो.
संध्याकाळी साडेआठच्या सुमारास आमच्या गाड्या निघाल्या; तेव्हा डोळ्यात उतरलेल्या अश्रूंमध्ये लक्ष दिव्यांचा प्रकाश प्रसरण पावत होता आणि संकेत देत होता... नव्या वाटेचे... जिथे पसरला आहे प्रकाशच प्रकाश! दोन तासांच्या वेळात गाड्या मुंबईच्या भव्यदिव्य आंतरराष्ट्रीय विमानतळावर येऊन पोहोचल्या. विमानतळाच्या पार्किंगमध्ये श्रीगणेशाचं नाव घेऊन उपास सोडला आणि निघालो ते उज्ज्वल भविष्याच्या प्रवेशद्वाराकडे...
रात्री अकरा वाजता आई-बाबा-सौरभ-मंदार-आदित्य-भावना यांचा निरोप घेऊन विमान'तळात' प्रवेश केला आणि स्वत:ची आणि सोबतच्या सामानाची तपासणी सुरक्षा अधिकाऱ्यांकडून करून घेण्यासाठी सज्ज झालो. बऱ्याच पातळ्यांवर चौकशी करूनही माझ्यात काहीच वावगं न सापडल्यामुळे सुमारे तासाभराने मी प्रतीक्षाकक्षात पोहोचू शकलो.
पहाटे २:३५ ला विमान उड्डाण करणार होतं. पण तोपर्यंतचा वेळही फोनवर बोलण्यातच गेला. मधल्या काळात आई-बाबा-सौरभ डोंबिवलीला घरी पोहोचले होते आणि मंदार-भावना-आदित्य पुण्याला मार्गस्थ झाले होते.
रात्री सव्वादोन नंतर आमचं विमान लंडनच्या दिशेने उडण्यास सिद्ध झालं. विमानाच्या प्रवेशद्वारापाशी प्रवाशांची एकच झुंबड उडाली... अगदी वडगावची एस.टी. निघणार म्हटल्यावर रहिमतपूर च्या स्थानकात व्हावी, तशी! पण जेट एअरवेजच्या चपळ कार्यकर्त्यांनी सर्वांना शिस्तीने विमानात प्रवेश द्यायला सुरुवात केली. या कार्यकर्त्यांमध्ये सहजस्मित करणाऱ्या स्त्री-कार्यकर्त्यांची संख्या अधिक होती. त्यामुळे, एस.टी. च्या कंडक्टरने अर्वाच्य भाषेत उद्धार करावा, अशी घटना कोणत्याही प्रवाशाच्या बाबतीत इथे घडली नाही.
सुमारे पाच-सहाशे प्रवाशांना घेऊन सज्ज झालेल्या या विमानाने 'यंत्रांचा आवाज' बरोबर २:३५ ला सुरू केला. पुढील दोन मिनिटात पायलटने 'रिव्हर्स' टाकला आणि पाचच मिनिटात त्या महाकाय यंत्राने माझ्या महत्त्वाकांक्षांच्या दिशेने झेप घेतली... - शेखर श. धूपकर