आलेच आहे होत, हो खंबीर माझ्यासारखा
संपेन मी नावानिशी, धर धीर माझ्यासारखा
खोटे खर्यांना मारण्यासाठी सदा शोधायचे
निर्जीव, घातक, गंजका, खंजीर माझ्यासारखा
वाघाप्रमाणे जाग येते, झोपताना वाटते
आहे कुठे दुनियेमधे उंदीर माझ्यासारखा?
होशील का तूही कधी अवखळ प्रवाहासारखी?
होईन का मीही कधी गंभीर माझ्यासारखा?
फेसाळणे, फुटणे पुन्हा, ते साहणे, हसणे पुन्हा
मी सागराच्यासारखा की तीर माझ्यासारखा?
मी कोण ते समजायला काहीच शतके राहिली
गालीब माझ्यासारखा ना मीर माझ्यासारखा
आडात नाही शांतता ती पोहर्यामध्ये तुझ्या
झालास आताशा मना तू वीर माझ्यासारखा
गीता पढवणे वेगळे, नाती विसरणे वेगळे
तू येच मैदानात या जाहीर माझ्यासारखा
मीही कधी होतो जसा तू 'बेफिकिर' आहेस.. पण
अंती तुला वाटेल, 'व्हावे पीर माझ्यासारखा'
-बेफिकीर!