राज्यपद

मनासारखे झाले आज, लग्न मुलाचे पडले पार
लक्ष्मीच आली घरात, आनंदाला नसे पारावार

सुनबाई मनांत म्हणते, सासुबाईशी नीट वागते
करीन मी आपलेसे, आईच्या जागीच हो मानते

सासुबाईच्या मनात विचार, सुनबाई आली घरात
सांभाळीण मी प्रेमात,मुलीसारखे वागवीन जनात

चार महिने निघून जाती, नवलाईचे दिन सरतात
सुनेचा वावर चाले घरात,अतिक्रमण गृहराज्यात

सत्तेचा खेळच न्यारा, राजकारणाचा घोळ प्यारा
सासुबाईचा चढतो पारा,सुनेचा चालत नसे तोरा

सुनबाई असे नवकाळाची,जाणीव तिला हक्काची
खेळी खेळते समझोत्याची, ठिणगी पडते संघर्षाची

मुलगा असे तो मातेचा, नवरा असतो तो पत्नीचा
भांडणात सापडे दोघींच्या, आनंद विसरे लग्नाचा

मागणी होते नवराज्याची, संमती मिळे नवऱ्याची
मनाई असे सासुबाईची, पुंडाई होत असे मुलाची

मुख्यमंत्री होई नवराज्याची, सत्ता चाले सुनबाईची
खुषी असे नवसंसाराची, कटकट नसे सासुबाईची

राजकारणाचा खेळच न्यारा, सत्तेसाठी झगडा सारा
खुर्चीसाठी भांडण तंटे, मिळता खुर्ची संबंध सुधारा