आपल्या हातात आले आपले नाते...
काय होते, काय झाले आपले नाते!
रंगवू, पायादुरुस्ती फार खर्चाची
नूतनीकरणास आले आपले नाते
आठवे सोयीप्रमाणे एकमेकांना
चांगले नाते निघाले आपले नाते
शोधुनी आसूसलेली मीलने रात्री
हे कुशीवरती वळाले आपले नाते
एकमेकांच्यात दोघे राहिलो हुडकत
ते धुळीमध्ये मिळाले आपले नाते
चौकशी केली जगाने बोचरी तेव्हा
"ठीक आहे मी" म्हणाले आपले नाते
'एक नाते गृहित धरले' एवढे चुकले
'बेफिकीरीने' उडाले आपले नाते