पांढराभक्क उजेड काळाढुस्स अंधार

पांढराभक्क उजेड
बाहेर काळाढुस्स अंधार
गरगरणारा पंखा
किरकिरणारे रातकिडे
दूर कुठेतरी वाजणारा भोंगा
भुंकणारी कुत्री
’जागते रहो’
वॉचमनचा प्रेमळ सल्ला
इथेच कुठेतरी सभोवताली
एकटा मी.

मांज्यात पंख अडकून
भेलकांडत खाली आलेलं ते कबूतर
कुठल्या नजरेनं बघितलं असेल त्यानं पतंगाकडे
तुटलेल्या पंखाची जखम हुळहुळताना

त्या रात्री कुत्रीही जरा शांत होती;
म्हणे अमावस्या होती.

बाहेर काळाढुस्स अंधार
सिगारेटचं जळतं टोक सुद्धा सूर्य वाटतं.
नव्हे; ती होती चिलीम, अफूची
कबूतरांवर पसा पसाभर धान्य फेकणार्‍याकडे
आशाळभूतपणे बघणार्‍या थोट्या भिकार्‍याची

रातकिडे किरकिरतायत अजूनही
मी ही असाच, इथेच,
अडकलेला
स्वाभिमानी
रांगेतल्या पुढच्यांची हांजी हांजी करत
पुढे जाणार्‍या तद्दन भिकार्‍यांविरुद्ध

वॉचमनचा प्रेमळ सल्ला
’जागते रहो’

ग्रामिण मुंबईकर
१३ सप्टेंबर ०९
११.४४ रात्र
हीच कविता आपण माझ्या अनुदिनीवर ही वाचू शकता... दुवा क्र. १