रविवारी गेलो होतो पाहण्यास एक फळबाजार
विविध आकार, रंगावरुनी असती अनेक प्रकार
प्रथम पाहिले पेरुना मी, असती कलमी अधिक
बुद्धिवर्धक, सात्विक पेरू असती,हे मलनाशक
जवळच होते ढीग ते,त्या काळपट सिताफळांचे
वृद्धी करतात मासपेशींची, बळ वाढवी ह्रदयाचे
लक्ष वेधिले माझे मग , पिवळ्या जर्द मोसंबीने
रुचकर तृषाहारक, शक्तीवर्धन करते सेवनाने
रास पडली होती जवळच,नागपूरच्या संत्र्यांची
चंगळ असे त्यात पित्तशामक,क्षुधावर्धक गुणांची
हाऱ्यात होती जांभळे, निळसर काळ्या रंगाची
रेलचेल असे यात लोह,फॉस्परस,चुना द्रव्याची
पेट्या आल्या खूपशा, लालाचुटुक सफरचंदाच्या
रोज सेवनाने , मुक्ती मिळते, पासून डॉक्टरच्या
घड बाजूला होते मग,पिवळ्या पिवळ्या केळाचे
गरीबाचे अन्न हे वाढवते, हिमोग्लोबीन शरीराचे
रसाळ,मधुर,सिडलेस द्राक्षे, आली होती मुबलक
मुक्ती देती कँन्सरपासून, असे या फळाचे गमक
राजेवाडी अंजिराच्या, टोपल्या भरल्या ह्या अनेक
क्षयरोगावर, रक्तवाढीवर, असे अंजीर उपकारक
रस्त्यात पाहतो ढीग, लाल पिवळ्या त्या पपईचे
वाढवते उत्साह मनाचा, दुखणे पळवी ह्रदयाचे
कलिंगडे दिसती मजला, हिरव्या काळपट रंगाची
शीतलता देई शरीरा, कमी करे दाहकता मूत्राची
आंबट गोड काटेरी फळे, असती ती अननसाची
मुबलक खाता दूर होई,काळजी त्या काविळीची
हंगाम सुरू असतो आता,फळांचा राजा अंब्याचा
खाऊन भरपूर वाढवा साठा, हो त्या रक्तमासांचा
हात घालता खिशात माझ्या, येई मी हा भानावर
मर्यादा असती अवलंबून, आपुल्या त्या पैशावर
विविध प्रकारची फळे असती, जरी या बाजारात
चाखावीत फळे घेऊनी थोडी, त्या त्या हंगामात