तुळजापूर शक्तिपीठ

बालाघाट चढुनी आलो,दर्शना तुकाईमाते
तुळजापुरवासिनी,  माता  तुज सर्व  ज्ञाते
दर्शन घेण्यास तुझे, माझे हे पाऊल पडते
अगणित भक्त पाहुनि, मन हे प्रसन्न  होते

विश्वकर्मा कारागिराने, मंदिर सुंदर बांधले
महाराष्ट्राची भवानीमाता, तुज  संबोधिले
शिवाजीने, कुलदेवी म्हणुनी  तुज वंदिले
कृपा करुनी भक्तावरी,त्याना तू उद्धारिले

सभा मंडपी गोंधळ घालती, तव भक्तगण
रात्र जागवुनी करती,भक्त देवीचे जागरण
नवस फेडण्यास करती,भक्त सत्यनारायण
प्रसन्न करण्यास करती, सप्तशती पारायण

सिंहासनी बैसली, जयविजय ढाळती चामर
महिषासुरास वधुनी, करसी  दुष्टांचा संहार
कृपादृष्टी ठेव आम्हांवर, विनवी  हा  पामर
कुलदेवी, तुज वंदितो,  अजाण कमलाकर