निघून गेलेल्या वाटेवरुनी
वाट पुन्हा दाखवेल का?
पडावं कोणत्या नगरीत आता
काळ काही सांगेल का?
जाणाऱ्या ह्या वाटेवरती
पाउले स्मरतात चिमुकली
धरून वाटी हातात दुधाची
काळ तिला पाजेल का?
फुर्र करून दूध पिणे ते
काळास त्या सोसवेल का?
घोडा करून पाठीवर बसविणे
काळास त्या झेपेल का?
छुम छुम वाजताच कोठे
कानास माझ्या जीव येतो
बोट धरून काळाचे पुन्हा
छुम छुम ती धावेल का?
माती तर खातात येथे
आवडून खडे ती खाई
निवसून वाटेत तिच्या
कोणी तिला देईल का?
कोण जाणे ह्या वाटा
लांब कुठवर जातात किती
स्मरतात ठसे जाणाऱ्याचे
येणारा कोणी दावाल का?
घेईन विचारून क्षेम आता
निजलेल्या बोक्याचे माझ्या
चॉकलेट जवळचे तेथे
रोज ती खाईल का?
सखा जर माझा असता
नित्याचाच सर्व काळ
पुसतो पदचिह्न जाण्याचे
पण ! तो सखा होईल का?