मी व माझी सावली

मी आणि माझी सावली

दोघे एकटेच गप्पा मारतो

दिवसभरात काय झाले

एकमेकाना सांगतो

         सूर्य तळपायला लागला की

         सावली माझी रुसून बसते

         आजुबाजुच्या गर्दीत

         स्वतःलाच हरवून बसते

हजारो वर पाहात चालणाऱ्यांकडून

तुडविली जाते ती नेहेमी

चुकविणे तिला माहितच नाही

लाथा झेलणेच नशिबी

        दिवसभरात किती बदलतेस

        कधी लहानशी तर कधी लां.. ब पसरतेस

        पाठ कधीच सोडत नाहीस

        मगे पडलो, तर पुढे होउन सावरतेस

आताशा माझ्या सावलीला

एक मैत्रीण असावीशी वाटते

मानेवर रुळणाऱ्या दाट केसांशी..

बाजूला झुलणाऱ्या वेणीशी

संगत करावी वाटते!

        सोबत असताना दोघी

        किती छान दिसतात!

        हातात हात घेउन चालताना

        मध्येच मिसळून जातात!

वर पाहण्यात रमल्याने एकदा...

माझ्याच सावलीला .. मी विसरलो

पायाला कोण टोचतयं कधीचं ..

अचानकच भानावर आलो

         दिवस मावळायला लागलाय

         सावली माझी दाट होतेय

         मझ्या दुखा:न सारखीच

         लांब.. रूंद पसरतेय

कधी ज्ञानपहाट होइल

कधी ही सावली विरळ होइल?

थोड्यानाच ते उमगते

सावलीच्या पाशात अडकलेला.. मी    

वाट पाहणेच नशीबात दिसते..!

       ~~~~~~~~मनिष