आजकाल मला एकांतात;
डोळे मिटायला भीतीच वाटते;
कारण त्या दाट काळोखात;
तुझी प्रतिमा अचानक उभी राहते.
मी आजही वेडा प्रयत्न करते;
तुझं नाव पुसायचा माझ्या हृदयावरचं;
पण ते तर तिथे कोरलं होत;
हे मला उशिराच कळत गेलं.
कुठेतरी माझ्या नशिबाची रेघ;
तुझ्या तळहातावर अलगद उमटायची;
भावनांची स्वप्नील पाखरे माझ्या;
तुझ्यापर्यंत कधीच नाही रे पोहचायची.
रोजचाच असायचा माझ्या सावलीचा;
तुझ्या सावलीशी पाठशिवणीचा खेळ;
सगळं मनासारखा घडत असताना;
साथ नाही द्यायची ति कातरवेळ.
आयुष्यातले चढ उतार पाहताना वाटायचं;
विसावावं तुझ्या मिठीत कधीतरी;
माझी स्वप्न तुझ्या डोळ्यांतून पाहताना
घ्यावीशी वाटायची एक उंच भरारी.
हे सगळं घडताना एक विश्वास असायचा;
तुझं माझ्या अवतीभवती असण्याचा;
पण तो एक भासांचा साकव असायचा;
तुझं माझ्यापासूनचं दुरावणं सांधणारा.