अंधाऱ्या दीर्घ प्रतीक्षेच्या
मुक्या रात्रीनंतर
आगमन होई उषेचे पूर्वेला
येई पहाट प्रहर
घरभर पसरे प्रकाश, येई
किलबिल ऐकू कानी
नव्या दिसाचे स्वागत करण्या
नवीन आशा मनी
सरली मागे निशा कालची
सरल्या साऱ्या व्यथा
मिटून गेल्या चिंता का मग
वळुनी पाहसी वृथा
नव्या दिसाचा शिरिगणेशा
नवीन पानावरती
उगा कालचा हिशोब मांडून
काय येतसे हाती
मनात घेउन नवी भरारी
पुन्हा नव्याने उठतो
नवीन दिवशी नव्या दिशेला
सीमोल्लंघन करतो