माझी प्रतिमा तुझ्या भिंतिवरी

आज सहजच माझा आत्मा;

तुझ्या घरात फिरायला आला;

भिंतीवरची माझी प्रतिमा बघून;

तो आश्चर्यचकितच झाला.

तू उभा होतास माझ्यापुढे;

तू लावलेल्या उदबत्तीच्या धुरात ;

माझा श्वास गुदमरत होता;

मला आवडतो म्हणून जुईचा गजरा तू आणलेलास;

डोळ्यात पाण्याचा थेंब आणण्याचा तुझा प्रयत्न;

पण खरं सांगू माझ्या जिवंतपणी तू हे केलं असतंसं;

तर कदाचित तो यमही थबकलाच असता.

तुझ्या चेहऱ्यावरचे भाव किती बदलले होते;

नम्रता; शालीनता अन् तीव्र दुःख;

खरं तर थोडी उजळणी कमीच पडली;

कारण आता तू केविलवाणाच दिसत होतास;

नको असलेल्या गोष्टी करताना;

दिसायचास ना अगदी तसाच.

तुझा हा अवतार बघून;

क्षणभर मला सुखच वाटलं;

पण नंतर मला  समजत गेलं की;

तुझी आदर्श नवऱ्याची प्रतिमा तू जपत होतास;

अगदी पूर्वीसारखीच;

माझी अस्मिता तुझ्या पावलांखाली तुडवून.

मीसुद्धा सुखी असण्याचा मुखवटा;

जिवंतपणी आयुष्यभर वापरला;

अन् मेल्यावर माझ्या प्रतिमेनेही;

तो अभिनय खरंच चांगलाच वठवलाय;

अरे हा तू पैसे फेकले असशील ना;

प्रतिमेतल्या माझ्या ओठांवर हसू फुलवण्याचे.

                                 माझा नवरा म्हणून तुला वागताच आलं नाही कधी;

                                 अन् विधुर म्हणून तुझं वागणंही नाटकीच वाटतंय.