ठरवतो मी नेहमीच;
काहीही न घडल्यासारख स्तब्ध राहायचं;
जमिनीवर पाय रोवून आकाशात झेपावायचं;
बेभान वारा पिताना;
त्याच्या वेगानं दिपून जायच.
ठरवतो मी नेहमीच;
माझ्याच पाऊलखुणा नव्याने शोधायच्या;
लागलेली माती झटकून टाकायची;
कुणाच्या तरी निर्विकार जीवनात;
शरदाचं चांदणं पसरायचं.
ठरवतो मी नेहमीच;
माझी स्वप्न उराशी घट्टं कवटाळावीत;
आयुष्याचं मोल देऊन त्यांना वास्तवात उतरायच;
मला रडवणाऱ्या नियतीलाच;
क्षणभर हसायला लावायचं.
ठरवतो मी नेहमीच;
मी आहे तसंच राहायचं;
जगण्याचा नवा अर्थ शोधायचा;
जगताना येणारी वादळ झेलीत;
सुखाच्या झुळकिशी हितगुज करायच.
हे सगळं ठरवताना;
बऱ्याचदा मला दमायला होत;
कुठून सुरवात करायची मी;
हेच मला विसरायला होतं.