कॅशिया

गुलमोहरपथावर पाहिला मी एक आगळा तरुवर
'कॅशिया' नाम त्याचे  असे, फुलला तो  हळुवार

फुटला फुलोरा तरुला लागताच चाहुल वसंताची
मुक्तहस्ते उधळण करतो बसंती रंगाच्या फुलांची 

द्राक्ष घोसाप्रमाणे दिसती पिवळी फुले कॅशियाची
फुलांनीच भरला तरुवर हजेरी नसे त्या पर्णांची

दिसते नयनरम्य दृष्य, रोज  सकाळी  सूर्योदयास
पडताच रविकिरणे त्यावर,पहात राहावे कॅशियास

दृष्य मनोहर पाहून जातो, प्रत्येकजण पथावरून
साठवून ठेवी सौंदर्य तरुचे, हृदयात डोळ्यामधून

वाटे पाहून हा तरुवर, असे ही नैसर्गिक फुलदाणी
प्रसन्न होई मन, पहाताच बहरलेली ती फुलराणी

नशिबवान असती लोक, पहाती हे मनोरम दृष्य
भाग्यवंत मी त्यातील, रोज अनुभवतो दृष्टीसुख

सृष्टीचा हा चमत्कार असे, बसंती रंगाची उधळण
रंग बसंती असे उत्साहाची, उन्मादाची घुसळण

हेमंतामध्ये हळूच फुटती, फुलोरे या तरुवराला
आगमना नंतर वसंताच्या, कॅशिया  हा बहरला

फुललेला कॅशिया हा, आनंदित करतो आसमंत
थक्क होतो पाहून अविष्कार विश्वकर्म्याचा,मनांत