बिनधास्त नाते आपले चालेल तोवर चालु दे !
केंव्हातरी दिन आपला संपेल... तोवर चालु दे !
'मी मारल्या हाका तरी नाही कुठे दिसलीस तू ..,
गेलो घरी! ' ही थाप ती मानेल तोवर चालु दे !
'केली तुझ्याशी मी युती, सत्संग थोडा लाभला;'
प्रेमात हा संवाद, ती ऐकेल तोवर चालु दे !
विसरून गेल्यावर मिठी, संपेचना रस्ता तिचा;
चालायची केंव्हातरी थांबेल... तोवर चालु दे !
नाते तुझ्याशी ठेवले आहे तिने जे आजवर..
कोणीतरी दोघात कंटाळेल... तोवर चालु दे !
सागर किनारी भेटल्या काही उथळशा भावना,
फेसाळणे त्यांचे तसे चालेल... तोवर चालु दे !
कोणीतरी होता मुके दरबार त्यांचा वाकला;
हा खेळ त्यांना रोजचा झेपेल तोवर चालु दे !