प्रवास

पायवाट म्हणाली, "सांभाळ!
अनवाणीच आहेस
ठाऊक नाही मुक्काम तुला.
प्रश्न सुरवातीला नसतोच,
ते येतात तेव्हा
उत्तरांचा शोध सुरू होतो,
वाटेकडं दुर्लक्ष होतं..."
अशातच वाट राखणं
हे तर जगणं, अन्यथा
सारेच प्रवास महामार्गी!
"महामार्गाचं बरं असतं,
तो बदलतो
माझं तसं नसतं
मी मातीचीच असते.
अनवाणी चालताना
पाय मळतील म्हणून सांगतेय..."
चालताना केव्हा तरी
वाट सुटली, भरकटली
आता पायाखाली केवळ
माती अन मातीच आहे
मी चालतोच आहे...
'मातीचे पाय'चा
दागिना मिरवत!