आमच्यात वाद नाहीत

 "ते तेव्हा गाजत होते. मी आत्ता गाजतोय..."
खुर्चीत बसलेला सूत्रसंचालक म्हणाला. टाळ्या पडल्या. जयाकाकू शून्य डोळ्यांनी हे टी्व्हीवर पाहात होत्या. तेवढ्यात त्यांचा मुलगा तिथे आला. त्याने ते दृष्य पाहिलं.
बायकोला बोलावलं.
बायको म्हणाली "हो. तो गाजतोय तरी. तू..."
"अगं असं कसं? गुरु.."
"इतकी वर्षं झाली तुम्हाला गुरु नाही मिळाला. घरातच होता गुरु."
"अगं, तो गुरु.."
"काही सांगू नका. मी आहे म्हणून आपल्या जो़डीची शोभा आहे, ऐश्वर्य आहे..."
"गुरु गाजला."
"तेच म्हणते मी. गुरुच फक्त."
"आई, बघ ना ही कसं करते."
"अभि, भांड्याला भांडं लागतंच संसारात. वादांचा सिलसिला जुनाच असतो..."
 मुलगा उठला. खिशातून मोबाईल काढला.
"काय करताय?"
"बाबांना सांगतो."
"तुझ्या बाबांना मी घाबरत नाही."
"ते नाही गं. त्यांना दृष्याबद्दल सांगतो."
 फोन लागला.
"बोल बेटा."
बेट्याने दृष्यकथा सांगितली.
"बरं झालं. आधी सांगितलंस. आज माझी मुलाखत आहे. पॅरिसच्या महोत्सवात आम्ही दोघांनी मिठी मारली होती ना रे? माझ्या डोळ्यांवर निळा, काळा व चॉकलेटी असा तिरंगी गॉगल होता. काही कळलंच नाही. पण तो बोलताना अडखळत होता का रे..?"
"नाही बाबा, ते अडखळणं फक्त संवादात. खरं बोलताना नाही." मुलाची बायको मोबाईलच्या कानात म्हणाली.
काही दिवसांनी मुलाखत प्रसारित झाली.
मुलाखतीनंतर ब्रेकिंग न्यूज झळकू लागली--"आमच्यात कोणतेही वाद नाहीत, आमच्यात कोणतेही वाद नाहीत."

*********
मुलाखत पाहणाऱ्यांपैकी एकीने दुसरीला विचारलं.
"खरंच का गं वाद नसतील?"
"तुला काय वाटतं?"
"आपल्यात कुठे आहेत वाद?"
"नक्की ना?"
"म्हणजे काय?" 
फोन वाजला.
पहिलीने फोन घेतला.
"मुलाखत फोनवरुन कशी काय शक्य आहे?"
"तुला वेळ नसेल तर फोन मला दे. काही वाक्यं मी सांगते. 'काळाबरोबर बदलत गेले' 'वेळात वेळ काढून नवे खाद्यपदार्थ शिकते'."
"गप गं. मला बोलू दे."
"मी सांगते ना!."
"नाही. मीच बोलणार."
"शांतता राख. एवढ्यात आपली भाची येईल. आपल्याला असं पाहून तिला काय वाटेल? तिला मार्गदर्शन करायचंय ना. मन शांत ठेव."

********
पुष्पगुच्छांच्या गरा़ड्यात बसलेल्या त्या दुसरीचं छायाचित्र प्रसिध्द झालं होतं. ते पाहात महेंद्र बसला होता.
मास्टर मैदानात आला.
"तू पेपरही वाचतोस, मह्या?"
"हो.मग?"
"केवढं मोठं व्यक्तिमत्व आहे नाही?"
"हो माहीत आहे. तू मोठं व्यक्तिमत्व आहेस."
"मी नाही रे. छायाचित्रात पहा नीट. आज त्यांचा वाढदिवस..."
"कळतंय मला. मी रांचीचा असलो म्हणून काय झालं?"
"बरं वाटलं. चल, एक षटक टाक पाहू."
"षटक?"
"ओव्हर."
"अरे, पण गोलंदाजी येत नाही मला."
"इथे दुसरं कोणीच नाही मला चेंडू टाकायला."
"त्यापेक्षा तूच टाक मला दोन चेंडू."
"का? माझी फलंदाजी तुला पाहायची नाही वाटतं?"
"असं कसं?
"परवा म्हणालास ते. तरुण रक्ताला वाव..."
"छे. ते वृत्तपत्रांनी.....तू पाहिजेस मला."
"नक्की ना..?"
"हो. मग? तो बघ तिकडून छायाचित्रकार येतोय एक. जवळ उभा राहा. खांद्यावर हात टाक."

********
मैदानावर दोघांचे एकत्र छायाचित्र पाहून झटकन विलासने टाळी मागितली. पाटीलसाहेबांना काहीच कळलं नाही.
"का हो अचानक टाळी ?"सुश्या म्हणाला.
"हे पहा, महाराष्ट्र व बिहार एकत्र. आता राज्याचे संकट नाही."
"राजचे संकट नाही म्हणा." पाटीलसाहेब.
"महाराष्ट्र व बिहार एक होणार? काय सांगता? हे नव्हतं माहीत. पण मुख्यमंत्री कोण...? एकाचं तुणतुणं वाजलं.
"तुम्ही आलात का? जरा म्हटलं बोलूया आपापसात तर..."
"आपापसात म्हणजे मी बाहेरचा...?"
 विलास, पाटीलसाहेब व सुश्याने एकमेकांकडे पाहिलं.
तंबाखू गालात ठेवली आहे, असे वाटावे असे एक स्थूल गृहस्थ मैफिलीत आले. शुभ्र कपडे. हातात छोटी बॅग.
"अहो, यांना चहा पाजा. बरं का तुणतुणंवाले, रागावू नका. कधी हार मिळतात. कधी प्रहार.."

तांबारलेल्या डोळ्यांनी तुणंतुणंवाल्यानं चौघांकडेही पाहिलं. तेवढ्यात अशोक किल्ली फिरवीत आला. त्यानं डोळ्यांनी काय झालं, म्हणून विचारलं.

"फक्त गप्पा मारायला म्हणून गेलो होतो. बाकी काही नाही...बाकी काही नाही" असं बोलत बोलत तुणतुणं बाहेर पडलं.
"पण कोणी काही विचारलंय का तुम्हाला?"
 प्रश्न ऐकून तुणतुणं दचकलं. कोणीच दिसेना. एका झाडाआड चार पोरं खिदळत होती.