अगत्यार जीव नाडी भाग १

अगत्यार जीव नाडी भाग १
स्वैर अनुवादक – विंग कमांडर (नि) शशिकांत ओक. मोः ०९८८१९०१०४९.

तमिळनाडू राज्याची राजधानी आहे चेन्नई उर्फ मद्रास. तमिळ संस्कृतीची देखील ती राजधानी आहे असे म्हटले तर फार अतिशयोक्ती होणार नाही. त्या ठिकाणी वडपळणी उपनगर आहे. पूर्वी फार लोकप्रिय, बालपणातील आठवणींचे "चांदोबा" हे मुलांचे मासिकाचे प्रकाशन, याच भागातील कार्यालयातून अनेक वर्षांपासून होत असे. तो प्रभाग नाडी भविष्यासाठी ही असाच लोकप्रिय आहे.

पूर्वी ओम उलगनाथन त्यांच्या ईरटै जीवनाडीचे अदभूत वाचन या भागातील एका मंदिरापाशी करत असत. त्याचे अनुभव, पत्ता माझ्या हिंदी पुस्तकात आहेत. आता सध्या अगत्यार किंवा (अगस्त्य) जीव नाडीचे वाचन श्री.हनुमत दासन या भागातील करत असतात. त्यांच्या जीव नाडीवाचनात आलेले काही अनुभव, किस्से "दिनतंती" नावाच्या तमिळ साप्ताहिकातून वेळोवेळी प्रसिद्ध होत असतात. त्याचे स्वैर भाषांतर श्री.विश्वनाथ गोपी करतात. मराठी वाचकांना त्यातील काही अनुभवांची ओळख करून देणे हा य़ा लेखाचा उद्देश आहे. त्या अनुरोधाने नाडी ग्रंथ भविष्याची सामान्य ओळख करून देऊन नाडी लेखनकर्त्या महर्षींचा भविष्य लेखनामागील उद्देश स्पष्ट करण्याचे कार्यही घडेल.

नाडी ग्रंथ भविष्य ही संज्ञा आता मराठी लोकांना गेल्या १०-१५ वर्षांच्या काळात थोडीफार परिचित झालेली आहे. दक्षिण भारतात तमिळ भाषेत ताडपत्रावर कूट लिपितून कोरलेले भविष्य आता महाराष्ट्रातील अनेक शहरात पहायला उपलब्ध आहे. रामायण, महाभारत, भागवत या धार्मिक ग्रंथांतून सामान्यपणे उल्लेखलेल्या अनेक महर्षींच्या नावाने या नाडी ग्रंथ भविष्य ताडपट्या उपलब्ध आहेत. त्यापैकी अगस्त्य, महाशिव, कौशिक म्हणजेच विश्वामित्र, वसिष्ठ, शुक, भृगु, काक भुजंदर (भुशुंडी) आदि महर्षींची नावे असलेल्या नाड्या सध्या जास्त प्रचलित आहेत.

ज्यांना नाडी ग्रंथ भविष्याची काहीच माहिती नाही त्यांच्या सोईसाठीदुवा क्र. १ थोडक्यात असे सांगता येईल की या महर्षींनी आपल्या प्रज्ञाचक्षूंच्या सामर्थ्यावर अनेकांचे जीवनपट पाहिले व आपल्या निर्देशनाखाली शिष्यगणांकडून त्याची काटेकोरपणे नोंद केली व अनंत काळपर्यंत मानवाला उपयोगी पडणाऱ्या नाडी ग्रंथ भविष्याची निर्मिती केली.

नाडी ग्रंथ भविष्य पहाण्यासाठी पुरुषांना उजव्या व स्रियांना डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा त्यावरील सर्व रेषा ठळक व व्यवस्थित दिसतील अशा बेताने उमटवून द्यावा लागतो. त्या रेषांच्या ठेवणीवरून महर्षींनी १०८ विभाग पाडलेले आहेत. नाडीकेंद्रात त्यापैकी उपलब्ध पट्यांशी त्या ठशांना पडताळून त्यांच्याशी जुळणाऱ्या पट्यांचे पॅकेट आणले जाते. नंतर त्यातील एकएक पट्टीतील थोडा थोडा मजकूर वाचून तो जातकाच्या माहितीशी जुळतो का, ते पाहिले जाते. बऱ्याच न जुळणाऱ्या पट्या बादकरून शेवटी एक अशी पट्टी येते की त्यातील सर्व माहिती जातकाशी तंतोतंत जुळते. उदाहरणार्थ स्वतः नाव, आई-वडिलांचे, पती-पत्नीचे नाव, जन्मतारीख, वार, महिना, साल, व त्यावेळची आकाशस्थ ग्रहांची स्थिती, शिक्षण. नोकरी-व्यवसाय, भावाबहिणींची, मुलाबाळांची संख्या व अशी काही माहिती जी केवळ त्याच व्यक्तीला ताडता येऊ शकते. त्यानंतर जेंव्हा व्यक्ती आपणहून मान्य करते की पट्टीतील सर्व माहिती १००टक्के जुळते आहे. तेंव्हाच त्या पट्टीतील कूट तमिळ लिपितील मजकूर एका ४० पानी वहीत सध्याच्या तमिल भाषेत उतरवला जातो. त्यावरून भाषांतरकाराच्या मदतीने एकएक वाक्याचा सावकाश अर्थ लाऊन ते सर्व एका ऑडिओ कॅसेटमधे रेकॉर्ड करून मग ती वही व कॅसेट ग्राहकाला सुपुर्त केली जाते व मग मेहनताना पूजारुम मधील शिव-पार्वतीच्या, महर्षींच्या फोटो समोर ठेवायला सुचवले जाते.

कुंडलीतील बारा स्थाने व्यक्तीच्या जीवनातील महत्वाच्या अंगांचा विचार करतात. त्याच धर्तीवर लग्न स्थानाच्या भविष्याला जनरल किंवा पहिल्या नंबरचे कांडम असे म्हटले जाते. त्यात सर्व स्थानांचे त्रोटक भविष्य कथन केले जाते. एखाद्याला कोणा एका विशिष्ठ स्थानाचे जास्त भविष्य जाणून घ्यायचे असेल तर उदा. विवाह विषयक ७ नंबरचे, नोकरीसाठी १० नंबरचे कांड काढून त्यातून विशेष माहिती मिळवता येते. नाडी ग्रंथ भविष्याचा पाया पुनर्जन्म व कर्मविपाक सिद्धांतावर आधारित आहे. त्यामुळे पुर्वजन्मातील पाप-पुण्यांच्या कमीजास्त प्रमाणात व्यक्तीला विविध मंदिरांना भेटी तेथे पुजा-अर्चना, अन्न-वस्त्र-जलदान, अपंगांना मदत करण्याला सुचवलेले असते. शिवाय जपसाधनाही सुचवली जाते. सध्याच्या धामधुमीच्या जीवनरहाटीत तो जप करण्याचा भार आपण नाडी केंद्राला सांगून करवून घेता येतो. त्याच्यासाठी वेगळा मेहनताना घेतला जातो.

हा झाला नाडी भविष्य जाणण्याचा सामान्य प्रकार. या शिवाय जीव नाडी असा एक विशेष नाडीचा एक प्रकार आहे. त्यात महर्षींशी आपण सद्यपरिस्थितीत आपल्या समस्या कथनकरून, त्यावर सल्ला-विचार विनिमय करून त्यातून वाट शोधू शकतो. सामान्य नाडी पट्टीतील मजकूर वाचून त्याचे भाषांतर करून सांगताना अनेकदा तात्कालिक समस्यांवर महर्षी काही भाष्य करताना दिसत नाहीत. त्यामुळे अनेकांचा विरस होतो. नाडी ग्रंथ भविष्याबद्दल नाही नाही त्या शंका येऊ लागतात. जीवनाडीतून अशा समस्यांचे-शंकांचे समाधान होते. असो.
               अगत्यार जीव नाडीचे अनुभव 

             एकदा श्री. हनुमत दासन यांच्याकडे एक मध्यम वयाचे ग्रहस्थ चिंताक्रांत मुद्रा घेऊन आले. म्हणाले, "माझा मुलगा मरीन इंजिनीयर आहे. तो सध्या नेदरलँड मधे शिपवर आहे. तेथे त्याला वरिष्ठांचा फार त्रास होत आहे. जीवे मारण्याच्या धमक्यांपर्यंत पाळी आली आहे. काही उपाय सुचवा."

हनुमत दासम यांनी अगत्यार जीव नाडीची पाने उलटून वाचनाला सुरवात केली. महर्षींनी त्याच्या कामाचे स्वरूप सांगितले, "त्या मुलाला हा त्रास गेले दोन वर्षांपासून होता. आता त्याच्या आय़ुष्याला धोका आहे. त्याने नोकरीचा राजिनामा द्यावा" अशी सध्याची माहिती सांगितली. ती ऐकून त्या ग्रहस्थांची खात्री झाली की ते आपल्या मुलाबद्दलच बोलत आहेत. पण नोकरीचा राजिनामा देण्याच्या आदेशाने त्यांचा गोंधळ झाला. ते म्हणाले, "ते कसे शक्य आहे? माझा मुलाला ही नोकरी करायला फार आवडते. इतक्या वर्षांनंतर पुढल्या काही महिन्यात तर त्याला चीफ इंजिनियरची बढती मिळणार आहे असे तो म्हणत होता."

दासन म्हणाले, "महर्षी म्हणतायत, त्याच्या वरिष्ठांना ते ठरवू दे."

चिंतेत पडलेले ग्रहस्थ म्हणाले, "विचारून सांगतो." काही तासात धापा टाकत परत आले व म्हणाले, "माफ करा. मगाशी बोलताना त्याला जीवे मारण्याच्या धोक्याविषयी पुढे काय ते राजिनाम्याच्या विषयांतरामुळे विचारायचा राहून गेले." त्यावर नाडी वाचून दासन म्हणाले, "महर्षी म्हणतात, ह्याच्या जिवाला का धोका आहे ते सांगतो. हा नोकरीला लागला तेंव्हा व्यवस्थित होता.पण नंतर कुसंगतीमुळे व मोहाला बळी पडल्याने स्मगलिंग करू लागला. त्यातून त्याने बराच पैसा व प्रॉपर्टी विकत घेतली. घरच्यांना ती नोकरीत घाम गाळून मिळवली असल्याचे तो अभिमानाने सांगत असे. पुढे त्याच्या वरिष्ठांना त्याच्या चलाखीची कल्पना आली. त्यांनी त्याच्या कडून फार मोठ्या रक्कमेची मागणी केली व ती पुरी न केल्यास त्याला मारून समुद्रात फेकून देण्याची धमकी दिली. "ते ऐकून हादरलेले ते ग्रहस्थ म्हणाले, "महर्षींनी यावर काही उपाय सांगावा."

महर्षी म्हणाले, "त्याने आधी त्याची गैरमार्गाने मिळवलेली सर्व रक्क्म व प्रॉपर्टी वरिष्ठांना परत करावी. अशा कुकर्मातून मिळवलेल्या पैशातून काही दैवी उपाय करायला मी सांगणार नाही. त्याच्या कष्टाच्या कमाईतून त्याने आपल्या कुलदेवतेला पूजा व अर्चना करावी नंतर ‘तिरुकडायूरला’ अभिरामी अम्मन मंदिरात जाऊन दीप लावावा व तेथील कार्तिकेयाच्या मूर्तीला गुलाबाच्या फुलांचा हार घालावा. हे सगळे त्याला तेथून करता येणे शक्य नाही. त्याच्या ऐवजी ही कामे त्याच्या आईवडिलांनी आजच्या रात्रीच्या आत करावीत. अन्यथा त्याच्या जिवाला काहीही बरे-वाईट होऊ शकते. त्याची हमी मी घेऊ शकत नाही."

ते ऐकून त्याचे कुटुंब त्वरेने कामाला लागले. काही दिवसांनी ते ग्रहस्थ परत भेटावयास आले तेंव्हा त्यांच्या बरोबर त्यांचा मुलगा होता. तो म्हणाला, "माझ्या वरिष्ठांनी पैसे घ्यायला संपूर्णपणे नकार दिला. माझ्यावरील बालंट गेले व मला प्रमोशन पण मिळाले! शेवटी मी गैरमार्गानी कमावलेली रक्कम भारतात परतल्यावर गोरगरिबांत वाटली! प्रॉपर्टी अनाथालयाला दान केली!" अशा तऱ्हेने महर्षींची कृपा झाल्याने धन्य वाटून पाया पडून ते लोक गेले!

महर्षींना कुकर्मांचा वाटणारा तिटकारा व चांगल्या जीवात्म्याबद्दलची कळकळ यातून दिसते.

एका जोडप्याला मुल नव्हते, तेंव्हा महर्षींनी सांगितलेले उपाय केले संतती झाली. पण त्याआधी दैवीउपाय करूनही संततीचा लाभ का झाला नाही याची काही कारणे सांगताना महर्षी म्हणाले, ‘१) पूर्वी केलेल्या पूजा विधीपुर्वक व त्याच क्रमाने केल्या गेल्या नव्हत्या. २) पुजाकरताना पैशाचे गणित मांडून फारच कोतेपणा केला तो नडला. ३) ज्या पुजाऱ्याने मंत्र म्हणून पूजा सांगितली त्याने गडबडगुंडा करून काम आटपले. ४) पुजा करते वेळी स्वच्छता व पावित्र्य पाळले गेले नाही. ’

नाडी ग्रंथ भविष्य पाहून शांती-दीक्षेचे सोपस्कार करूनही योग्य तो परिणाम का झाला नसावा याची कारणे यावरून शोधावीत.

एकदा एक जण श्री.दासन अगत्यार जीव नाडीपट्टीत पाहून जे सांगतात ते खरेच असते का? त्यातील ज्योतिष खरे होते का? त्यात सांगितलेल्या दैवी उपायांनी खराच काही उपयोग होतो का की सगळी बनवाबनवी आहे? असे प्रश्नांचे किडे वळवळत परीक्षा करायला आला. दासनना म्हणाला, "माझा असल्या गोष्टींवर विश्वास नाही. मी देवाला मानत नाही. या नाडी ग्रंथ भविष्यावर तर माझा बिलकुल विश्वास नाही. तरीही तुमच्या महर्षींची कसोटी घ्यावी व जमलेच तर माझ्या समस्येचे निराकरण करावे म्हणून मी इथे आलो आहे."

त्यावर दासन म्हणाले, "जर तुझा नाडी ग्रंथ भविष्यावर विश्वास नाही. महर्षींच्या शब्दावर आस्था नाही तर इथे येऊन का वेळ व्यर्थ घालवतोस ?"

"इथून जर काही उपाय सापडले तर मी त्यांच्यावर विश्वास ठेवायला तय़ार आहे. म्हणूनच ते पहायला मी आलो आहे. तरी मला काय ते मार्गदर्शन करावे. कारण दीड महिन्यापूर्वी मला कॅन्सर झाल्याचे कळले. तेंव्हापासून औषधपाणी चालू आहे. पण मी बरा होऊन वाचेन का? हे विचारायला आलो आहे."

"जर तुला उपाय हवे असतील तर अगस्ती महर्षी जे करायला सांगतील त्यांच्या वर संपूर्ण विश्वास हवा." त्यावर तो म्हणाला, "हो हो मी विश्वास ठेवेन."

दासन म्हणाले, "तू माझ्या समाधानासाठी तोंड देखले म्हणून मला काय उपयोग? मी फक्त महर्षीच्या शब्दांना कथन करणारा नाडीवाचक आहे. ते काय म्हणतात, ते मी सांगेन ते तुला ऐकले पाहिजे."

"हो पण माझी एक अट आहे की मी उपाय वगैरे करणार नाही. पण मला बरे करा अशी माझी विनंती आहे. " दासन त्याच्या उद्धटपणावर रागावले व विचार करु लागले की महर्षींनी सुचवलेले उपाय याला सांगावेत तरी कसे?

"बर बघतो ते काय म्हणतात ते". असे म्हणून दासन वाचायला लागले.

"एक व्यक्ती राजा रामचंद्रांचे नाव घेऊन देशावर राज्य करण्याच्या इराद्याने उङी घेत आहे. अयोध्या नगरीतील मंदीर बांधण्याच्या आवेशाने काही दारुड्या, मवाली, पैसे चारून जमवलेल्या लोकांना हाताशी धरून लोकांना बहकवले जात आहे. असत्याची कास धरणारे देशावर राज्य करत आहेत. आपल्या जवळच्या नातलगांना धडधाकट असूनही रोगी आहोत असे म्हणून त्यांच्या नावाची मालमत्ता गिळंकृत करण्याची चाल खेळली जात आहे. फसवले जात आहे."

दासनांच्या लक्षात आले की मजकूर तुटक व असंबंद्ध असून समोर बसलेल्याच्या संदर्भात हा लागू नाही. म्हणून त्यांनी त्याला पुन्हा कधीतरी ये म्हणून कटवला. जाताना तो म्हणाला, "पाहिलेत, मी म्हटले नाही असे बाष्कळ काहीतरी तुम्ही सांगता भविष्य म्हणून. बर मग मी उद्या येतो. "

दुसऱ्या दिवशी...

कालच्या वाचनावर भाष्य करताना महर्षी म्हणाले, "काल मी जे म्हटले की रामाच्या नावाचा बहुरुपी देशावर राज्य करू इच्छितो तो म्हणजे ‘एन टी रामाराव’. ज्याने रामाचे रोल सिनेमात केले व तेलगू देसम नावाची पार्टी काढली आहे. उद्याच्या पेपरात ती बातमी वाचायला मिळेल. पुढे मी रामजन्मभूमी वादाविषयी बोललो. तिसरी गोष्ट होती जो तुझ्या समोर बसला होता त्याच्या बद्दल. तू माझा वाचक असूनही तुला माझे शब्द कळले नाही. त्या समोर बसलेल्याला कॅन्सर वगैरे काही झालेला नाही. घरच्यांची सहानुभूती मिळवणे व आपल्या प्रेमपात्राच्या नावावर प्रॉपर्टी करायच्या उद्देशाने ही त्याची चाल आहे. पण मला फसवून त्याला काय मिळणार?

हे खडे बोल ऐकून ती व्यक्ती थोडी वरमेल असे दासनना वाटले. ते पुढे वाचून म्हणाले, "माझ्या भविष्य कथनाची सत्व परीक्षा घ्यायला हा देवावर विश्वास नसलेला आला आहे. नाडीवाचका, माझ्या कथनावर विश्वास ठेव की हा काही काळाने पुन्हा माझ्याकडे येणार आहे! विचार काय कारण? त्या वेळी त्याला तोच रोग खरोखरच झाला असेल. जो रोग त्याने सध्या खोटेपणाने झाल्याचे पसरवले आहे.

हे सर्व वाचून श्री.हनुमत दासना वाटले आता तरी हे ऐकून तो महर्षींची आपल्या कुकर्माबद्दल क्षमा मागेल. पण झाले उलटेच. तो उर्मटपणाने म्हणाला, "हे सगळे भविष्य कथन मी खोटे ठरवीन. आणि उठून चालता झाला!"

तीन महिन्यानंतर...

एक दिवस एका माणसाला दोन जण बखोट्याला धरून आणताना दिसले. त्याला चालता येणे शक्य नव्हते. विचारपूस करता त्यापैकी एक म्हणाला, "याना पॅऱॅलेसिसचा अटॅक आला आहे. त्यांना धड बोलताही येत नाही. म्हणून त्यांनी एका चिठ्ठीवरील मजकूर वाचून दाखवला. "अगस्त्य महर्षींनी पुर्वी सांगितलेले कथन अगदी सत्य झाले.

"मग मी आता काय करू?" दासननी विचारले. "आता काही तरी करून यांना वाचवा अशी विनंती आहे". दासन विचारात पडले. पट्टया काढून वाचायला लागले. महर्षी त्यात म्हणाले, "हा आलेला माणूस तोच आहे, ज्याने कॅन्सर झाल्याचे खोटे सांगितले होते. आता त्याला पोटातला ट्युमर झाला आहे. त्याची ही प्राथमिक अवस्था आहे व माझ्याकडे बरे होण्याच्या उद्देशाने आला आहे. म्हणून मी त्याला एक औषध सांगतो त्याने तो बरा होईल. ती जडीबूटी कोणती, ते औषध बनवायची कृती व डोस कसा घ्यायचा ते ही सांगेन!" महर्षी पुढे म्हणाले, "याने आपल्या भावाबहिणींची मालमत्ता हडप करण्याचा घाट घातला होता. पुर्वीच हा माझे आशीर्वाद घेऊन गेला असता व कुकर्मे केली नसती तर ही वेळ त्याच्यावर आली नसती. बर असो. ह्या जडीबूटीच्या झाडाचा शोध सदुरगिरीपर्वतावरदुवा क्र. २ घ्यावा. सांगितलेले औषध काटेकोरपणे बनवून घ्यावे. "

त्यानंतर त्याने ते औषध घेतले व पॅऱॅलेसिस व ट्यूमर मधून बरा झाला व निरोगी जीवन जगू लागला. महर्षींच्या लेखी विश्वास ठेवणारा वा न ठेवणारा असा दुजा भाव नाही. शरण आलेल्या कोणावरही ते कृपा करु शकतात. हे या उदाहरणावरून दिसून येते.

वाचकांची इच्छा असेल तर थक्क करणारी आणखी अनेक कथने सादर करता येतील.

(भाग – १ क्रमशः) -----------------

श्री. हनुमत दासन यांचा घरचा पत्ता – MIG FLATS, 94/1, 11TH AVENUE, ASHOK NAGAR P.O., CHENNAI- 600083. फोन -०४४- 24897491.
वडपळणी पत्ता - 7/2, Alagiri Nagar East Street 1st floor (Hall) Alagiri Nagar Vadapalani Chennai - 600 026. येथे वाचन दर बुधवारी व शुक्रवारी दु,२ ते रात्री १० पर्यंत चालते. तथापि, त्यांच्याशी संपर्क करताना आताशे बरेच कष्ट पडतात. त्यांची भेट फार दुर्मिळ झाली आहे. असे हे लेख वाचून भेट घेणाऱ्यांचे मत आहे.