मुक्त व्हावे वाटते हे वाचुनी सारे मला

का, कधी, कोठे, कुणासाठी नि कोणाच्यामुळे?
तप्तता अगणित, अकल्पित वस्तुमानाच्यामुळे
स्फोट त्या अज्ञात बिंदूचा अचानक जाहला
जन्मल्या साऱ्या मिती अन काळही ज्याच्यामुळे

दशदिशांना धूळ गेली, यामुळे कळल्या 'दिशा'
त्या युगाला दिवस कळले, आणि आकळल्या निशा
दीर्घिका अब्जावधी स्फोटामुळे साकारल्या
अन गुरुत्वाकर्षणाने झिंगल्या वेड्यापिशा

एकमेकांपासुनी त्या पोचल्या कुठल्याकुठे
हेलियम हायड्रोजनाने तारका जमल्या तिथे
अब्ज ताऱ्यांची मिळोनी एक झाली दीर्घिका
दीर्घिका अब्जावधी या आपल्या विश्वामधे

दीर्घिकांपैकीच ही आकाशगंगा आपली
अब्ज भावंडांबरोबर एक तीही जन्मली
ती सहाशे अब्ज सूर्यांना अता सामावते
टिंबही नाही खरे तर सूर्यमाला आपली

भास्कराला पाच अब्जे लागले यंदा म्हणे
आणखी तितकाच त्याचा काळही उरला म्हणे
मूळचा तारा न तो, तो जन्मला ताऱ्यामुळे
एवढासा एक हा 'उद्यानदिप' तारा म्हणे

कॅल्शियम, पोटेशियम, अन लोह त्याला लाभले
आपल्या बापामुळे सिलिकॉनसुद्धा लाभले
प्राणवायू, नत्र, कर्बे, मूलद्रव्ये लाभली
रंजनासाठी ग्रहांचे खेळ त्याला लाभले

आपल्या प्रुथ्वीत आले सर्व ते त्याच्यामुळे
आपल्या देहास लाभे सर्व ते त्याच्यामुळे
दिवस, रात्री, वर्ष, महिने या स्थिती त्याच्यामुळे
जेवढे आयुष्य आहे सर्व ते त्याच्यामुळे

त्यातसुद्धा सागराने भाग जादा व्यापला
जेवढा भूखंड आहे, माणसाला लाभला
खंड केले, देश केले, राज्य, जिल्हे, तालुके
ताकदीने माणसाने बंगलाही बांधला

धर्म, जाती, पोटजाती, पाडल्या आता इथे
स्त्री, प्रतिष्ठेवर लढाया चालल्या आता इथे
दौलतीसाठी कुणाचा वंश संपवला कुणी
शोषणाच्या फक्त वृत्ती वाढल्या आता इथे

जाहली रामायणे, सांगून गीता जाहली
बुद्ध झाले, गुप्त झाले, मोगलाई संपली
आर्य, पोर्तूगीज, इंग्रज, डच, सिकंदर संपले
पेशवे, राजे शिवाजी अन स्वराज्ये संपली

संत गेले, क्रूर गेले, बुद्धिवादी लोपले
शोधले आनंद, साऱ्यांनी सुखाला शोधले
ठोकले चंद्रास, कोणी मंगळावर पोचले
मात्र, का फुलती फुले कोणीच नाही जाणले

शांत व्हावे वाटते, हे वाचुनी सारे मला
'का असावे' वाटते, हे वाचुनी सारे मला
एकही उद्देश नाही आपला बहुधा इथे
मुक्त व्हावे वाटते हे वाचुनी सारे मला