चालताना मी वाट एकाकी
सूर्याला कां ताप व्हावा?
खुपती कां त्याच्या प्रियेला
पादत्राणे जी पायात माझ्या ?
तपनतापाच्या झळांची
तीव्रता जाणोनी तरुलता
धरित होती माझ्या शिरी
गारवा निथळणारी छत्रछाया॥
अटवीची उद्धतता अशी
साहवे तमारीस त्या कशी ?
खुणावताच अटवी-अरिसी
वादळाला जाग आली ॥
निरागस त्या तरुलतांचा
थोर थरकांप अनिवारसा
पाय माझे हळहळले, थांबले
नयनांनी अश्रू चार ढाळले ॥
***
नयनात माझ्या दाटलेली
कोलंबसी स्वप्नांची नशा
लगबग भारावल्या गलबताची
साथ दिलखुलास मज द्याया ॥
साहसी माझ्या प्रवासाचा
सागरास कां ताप व्हावा?
खुपते कां त्याच्या प्रियेला
स्वप्नांचे आक्रमण माझ्या?
साहवे सागरास त्या कशी
गलबताची उद्धतता अशी?
खुणावताच धीवर-अरिसी
तुफानास जाग आली ॥
सुहृदता निरागस गलबताची
हेलपाडली अनिवारसी
स्वप्ने माझी विरघळली
नयनात आसवे दाटली ॥
***
शोध अनंताचा घ्यावया
जिज्ञासा माझ्या अंतरी
आस पुरवावया माझी
घेई वैनतेय पंखांवरी ॥
उदात्त माझ्या प्रवासाचा
गगनास कां ताप व्हावा?
खुपतो कां त्याच्या प्रियेला
अवकाशातिल संचार माझा?
साहवे गगनास त्या कशी
वैनतेयाची उद्धतता अशी?
खुणावताच खगकुलअरिसी
झंझावातास जाग आली॥
उदात्तता निरलस वैनतेयाची
झाली असहाय्य अनिवारसी
जिज्ञासा माझी हबकली
नयने नीर पाझरू लागली ॥
***
पुन्हा पुन्हा मी जन्मतो
तीच वाट चोखाळतो
भवसागरात साथ द्याया
दैवेच तंव सहवास लाभतो ॥
भंगल्या माझ्या मनाला
देतेस् तूं उमेद नवी
परी काळ कां हा त्रासलेला?
प्रियाच नाही कोणी तयाला ॥
तो निर्घृण छद्मी महा
कुणी न याचा चाहता
ना भल्याबुऱ्याची चाड याला
अपुल्याच नशेत चूर हा ॥
देखोनी तुज माझ्यासवे
क्षणभर याचे मन चळे
खुन्नस त्याची पाहताची
वावटळीस जाग आली ॥
दुर्दम्य तुझ्या प्रेमाचे
दृढ कवच मी पांघरलेले
वावटळ आली गेली
तंव मिठीत उषःप्रभा खुलली ॥
---