केळीचे बन

पाहिले समोर आज, केळीचे सुंदर बन

होती झाडे केळीची, ती  दाटून  दाटून
वाऱ्यासंगे हलती, जशी लाट पाण्यातून
आचंबित होतो, त्यांचा एकोपा पाहून
असती झाडे कांही,  लेकुरवाळी  सुंदर
तोलती भार कसा, लेकराचा शिरावर
आधार देती त्याना, शेजारील बंधुवर
गुण्यागोविंदे राहती, ते बनून परिवार
करती सामना हो, संकटाचा मोठी पाने
थंडी, वारा, पाऊस,घेती शिरी आनंदाने
रक्षण करती लेकरांचे, कसे मुष्किलीने
समाधान असे मनी, घर ते वाचल्याने
जोपासती माळी, त्याना मनापासून
खतपाणी घालती, योग्य वेळ साधून
तरारती झाडे सारी, हसती खळाळून
जगी सुखी असती, म्हणती मनांतून
मग येई काळरात्र, ध्यानीमनी नसून
येतो माळीबुवा, हाती कोयता घेऊन
घाले घाव मूळावर, असती ते निघृण
सत्यनारायण पूजेला, नेती हो तोडून