आषाढसरी बरसल्या मोकळ्या

शिवमंदिरात तिन्हिसांजेला
जायचो मी दर्शनाला ।
श्रद्धेला नव्हतो बांधलेला
माझा तो एक विरंगुळा ॥

पुष्करिणीच्या शांत जळात
खडे मी मारीत होतो ।
अंतरीची आसूस अनामिक
खुळा मी समजत नव्हतो ॥

शुष्क रानातुन चालताना
कोळपलेल्या माझ्या कल्पना ।
बहरताना तूं जोपासलेल्या
अरुवार स्त्रीसुलभ भावना ॥

तुझ्या मनातिल फुलपाखरांना
निवारा सुरक्षित होता हवा ।
पुष्करिणीच्या त्या जलाचा
तंव नयनात दाटलेला हेवा ॥

तुझ्या मनातिल पाखरांना
शुभशकुन अवचित् झाला ।
तंव पैंजणांच्या आवाहनाला
मम पावलांचा प्रतिसाद लाभला ॥

निकट पाहताना मला अन्
लाजल्या तंव नयनपाकळ्या ।
दोघांच्याही मनात घन
आषाढसरी बरसल्या मोकळ्या ॥