सचिनऽऽ.... सचिनऽऽ..

सचिन रमेश तेंडुलकर या तीन अक्षरी बांद्रेकाराने तुम्हा आम्हाला माहीत असलेल्या आणि नसलेल्या क्रिकेटच्या असंख्य आख्यायिका रचल्या आणि बऱ्याच नव्याने सजवल्या. काल-परवाकडेच त्याने १७००० धावांचा पल्ला मोठ्या सहजपणे पार केला तेव्हा  सात वर्षाच्या टिंग्या आणि सत्तर वर्षाच्या त्याच्या आज्याने आपल्याच घरचे कार्य सुरळीत पार पडल्याप्रमाणे मोठ्या प्रेमाते आकाशातल्या बाप्पाचे आभार मानले आणि त्यानंतर "दिल मांगे मोर"  गात त्याच्या आणखी एका शतकासाठी त्याच बाप्पाची आराधना चालू केली .

सचिन नावाच्या ह्या जादुगाराने गेल्या दोन दशकांपासून गल्लीबोळातल्या तमाम क्रिकेट प्रेमीनवर असच अखंड गारुड केलं आहे. जगातली विविध लोक त्याला अनेकविध नावाने ओळखतात. कोणासाठी तो डॉन ब्रॅडमन असतो, कोणा साठी मास्टर ब्लास्टर, कोणा साठी लिटल-चँपिअन तर अनेक टीका-कारान साठी तो (अकारण) अप्पलपोटा, विक्रमांसाठी खेळणारा स्वार्थी तेंडुलकर असतो. तो कोणा साठी कोणीही असला तरी तुम्हा-आम्हा अतिसामान्य क्रिकेट प्रेमींसाठी फक्त सचिनच असतो,   आपल्या भावनांवर  दोन दशके राज्य करणारा आपला सख्खा सोबती. लाखभर लोकांनी भरलेल्या इडनगार्डनवर त्याच्या विकेट नंतर स्मशान शांतता पसरते. त्याने  शोएब अख्तरला प्रेक्षकात भिरकावल्यानंतर आफ्रिकेतल्या सेँच्युरीनवर दिवाळी साजरी होते. फ्लींटोफला मारलेल्या कडकडीत कव्हर ड्राइव्हने पांढरपेशा शिस्तीच्या लाँडसचा मुंबई मासळी बाजार होतो. शारजाच्या वाळवंटातील त्याच्या वादळीखेळीने हजारो मैलावरची  अख्खी ऑस्ट्रेलिया पाणी-पाणी होते आणि बॅडपँच मधल्या त्याच्या न्हर्वस नाईंटीत  त्याच्या पेक्षा जास्त घाम आपल्याला आपल्याच दिवाणखान्यातल्या पंख्याखाली फुटतो.

चौदा वर्षाच्या, किरकोळ शरीरयष्टीच्या आणि डोक्यावर अकारण वाढवलेल्या कुरळ्याकेसांच्या  ह्या मुंबईकर वंडरबाँयचा  तुम्हाआम्हा सर्वांचा पोस्टरबाँय सचिन कधी झाला ते लक्षात आलेच नाही. अब्दुल कादिरला बेडरपणे पेशावरच्या  साईडस्क्रीनवर भिरकावणारा, सातफुटी महाकाय अंब्रोसला पूल करण्यासाठी अंगावर घेणारा, सळसळणाऱ्या सिडनेच्या धावपट्टीवर स्लेजिंग सकट अख्ख्या ऑस्ट्रेलियाला  पुरून उरणाऱ्या  आणि साकलेनच्या  दुसऱ्यावर  लेटकटचा उतारा शोधणाऱ्या या रोमहर्षक आणि तितक्याच आश्वासक प्रवासात क्रिकेटवेड्या या देशात त्याला मनाच्या गाभाऱ्यातील मानाचे स्थान अटळ होते.

या क्रिकेटच्या देवाला सुद्धा असंख्य संकटे पचवावी लागली . ऐन विश्वचसकात वडिलांचे निधन, प्रचंड बहरत असताना मागे लागलेली पाठदुखी, न केलेल्या बाँल टेंपरिंगचा किटाळ, अयशस्वी कर्णधार बिरुदावली आणि  प्रदीर्घ काळ लांबलेल्या बॅडपँचचा चटका.   देव जेवढा मोठा, तेवढा त्याला पारखणारे असंख्य या न्यायाने या वाईट  काळात तोंडाळ टीकाकारांची कोल्हेकुई प्रचंड वाढली. या झटपट टीकाकारांनी त्याला निवृत्तकरून नव्या रक्ताला वाव देण्याच्या असंख्य आरोळ्या ठोकल्या. पण तुम्हा-आम्हा अतिसामान्य क्रिकेट रसिकांच्या  अटळ श्रद्धेचा विजय होत गेला. आपला सचिन या संकटातून मार्ग काढून दिमाखाने नेहमी प्रमाणे राज-रस्ता चालू लागला.

क्रिकेटच्या या राजासाठी तुम्हा-आम्हा क्रिकेट वेड्या रसिकांच्या शुभेच्या कायम असतील. कारण हा राजा क्रिकेट पुरता मर्यादित न राहता बनतो आयुष्यात वाट दाखवणारा एक सवंगडी, दिशा दाखवणारा एक खेळगडी. त्याच्याकडे पाहून अशा अखंड तेवत राहते  की  सामान्य ते असामान्य हा प्रवास आजही प्राप्य आहे स्वकर्तृत्वाचा बळावर,   कोणताही  राजकारणी हात डोक्यावर नसताना. त्याच्याकडे पाहून श्रद्धा अभंग राहते की यशाच्या जगात कष्टाला पर्याय नाही, हजारो धावांची पुण्याई पाठीशी असताना सुद्धा. त्याच्याकडे पाहून समजते पाय जमिनीवर असण्याचे महत्त्व, हजारो कॅमेऱ्याच्या लखलखाटात. तो शिकवतो विध्याताशी कृतज्ञ राहायला, आकाशाकडे बँट उंचावत  प्रत्येक शतका नंतर. तो बिंबवतो आमच्या मनावर देशप्रेमाचे महत्त्व... खेल-रत्न आणि पद्मभूषण महत आदराने स्वीकारत.. गैहजर न राहता...

आम्ही वाट पाहतो आहे त्याच्या नव्या शतकाची आणि हजारो आणखी धावांची.