लंकेची पार्वती

सोने की लंका जलाय गयो रे, एक छोटोसो वानर....
रावण को पानी पिलाय गयो रे, एक छोटो सो वानर...
ढुडुम ढुम टू ढुम ढुम...

मंदिरात ढोलकी.. टाळ.. टाळ्यांच्या गजरात गाणं खूपच रंगलं होतं. ते कानात इतकं बसलं होतं.. आणि त्या सोबतच सोनेकी लंका सोनेकी लंका हे शब्दही एकसारखे मनात येत होते आणि प्रष्णही तेवढेच पडत होते.

रामायणातले लंकादहन आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. हनुमानाने सोन्याची लंका जाळली.
लंका सोन्याची खरंच होती का? होती तर सोन्याची का होती आणि कुणी बनवली होती?
सीतेला लंकेची पार्वती का म्हणतात?
लंकेत सोन्याच्या विटा हा वाकप्रचार का रुढ झाला असेल?

जाउदे ना ही सारी पुराणातली वांगी - वानगी. पण पुराणात ह्या साऱ्याचा उल्लेख आहे म्हणजेच त्यामागे काही ना काही गोष्ट असली पाहिजे. प्रत्येक संदर्भासाठी काही कथा दंत कथा सांगितल्या जातात. त्यापैकीच ही सोन्याच्या लंकेची आणि पार्वतीची कहाणी.

कैलासावर राहणाऱ्या अजर अमर शिवपार्वतीची एक कहाणी आहे. बसल्या बसल्या एके दिवशी देवी पार्वतीच्या मनात आले की देवी लक्ष्मीला भेटायला तिच्याकडे जायचे. शंकर भगवान नको म्हणत असतानाही शेवटी त्यांची आज्ञा घेउन देवी पार्वती लक्ष्मी कडे गेली. खरं तर प्रभू इच्छेविरूद्ध काहिही घडणे कठीणच. पण मन वेडं असतं तेच संकल्प विकल्प घडवून आणतं जेव्हा जिथे हवं तिथे आपल्याला घेउन जातं, त्याच प्रमाणे पार्वतीचं मनही भरकटलं होतं. ती अतीशय आनंदाने देवी लक्ष्मीकडे जायला निघाली. मनात विचार करीत होती की मला अकस्मात आलेलं बघून लक्ष्मी माझं स्वागत करेल खूप आदरातिथ्य करेल. स्वतःच्या आसनावरून उठून धावत येउन मला मिठी मारेल, जबरदस्ती ने माझा हात धरून मला आसनस्थ करेल, धूप दीप नैवेद्याने मग मला सन्मानीत करेल वगैरे.

पण पार्वतीने जो विचार केला होता तसं प्रत्यक्ष झालंच नाही. घरी आलेल्या उमा पार्वतीला लक्ष्मीने साधं पाणीही विचारलं नाही. उलट अभिमानाने स्वतःचा तोरा मिरवत लक्ष्मीने पार्वतीला तिचं सारं राजभवन, धन वैभव, नोकर चाकर दाखवून खूप हिणवलं आणि म्हणाली, "ज्याला सारं जग त्रिपुरारी म्हणून ओळखतं तो तुझा भिकारी नवरा कुठे आहे? चिता-भस्म, त्रिशूल-फावडी आणि फाटकं मृगजीन घेउन त्यानं कुठे बस्तान बसवलं आहे? " पार्वतीने हे ऐकताच तिचा क्रोधाग्नी भडकला, ओठ थरथरले, जीभ फडफडली.. ति म्हणाली, "तू माझा सन्मान नाही केलास तरी चालेल पण माझ्या पतीचा विनाकारण अपमान मी सहन करणार नाही. माझ्या पतीला भिकारी म्हणताना तुला लाज वाटत नाही? खरं तर तुझ्या पतीला द्युता खेरीज कधी काही कामकाज नाहिये. तोच भिकारी राजा बनून शिवाकडे गेला असेल. किंवा वामन बनून बलीकडे गेला असेल. सतत सगळीकडे आपली झोळी पसरून भिक मागत फिरत असतो. दधिची रुषींकडे तर त्याने हाडं भिक्षा म्हणून मागीतली होती. विसरलिस का? शंकर तर जगाचे तारणहार भोले भंडारी आहेत. " पार्वती अश्या प्रकारे लक्ष्मीवर चिडली आणि उद्विग्न मनाने ती कैलास पर्वतावर परतली.

पार्वतीला पाहून अंतर्यामी भगवान म्हणाले, "हे देवी आज चेहरा एवढा उदास का? " त्यावर उमा पार्वतीने लक्ष्मिने केलेल्या उपहासाचं वर्णन करून शिव शंकराला सांगितले. आणि म्हणाली, "आजपासून मी अजिबात अन्न पाणी घेणार नाही, उपाशी राहून भले माझे प्राण मला गमवावे लागले तरी बेहत्तर. तुम्हाला जर माझे प्राण प्रिय असतील तर मी सांगते तसा महाल मला बनवून द्या. महाल बनवल्यावर गृहप्रवेशासाठी लक्ष्मीला आमंत्रीत करून मला माझ्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे. माझ्या अपमानाचा असा बदला घेइन की सारी दुनिया बघत राहिल. " ह्यावर शंकराने पार्वतीला खूप समजावलं. म्हणाले, "मान अपमान, हे सारं आपण मानण्यावर असतं. जाउदे ते कडवट बोलणं विसरून जा. राग विसरून तुझं मन शांत कर. त्यातच खूप सुख आहे. " पण देवी पार्वती ऐकायला तयारच नव्हती. हट्टाने ती रडू लागली.

मग भगवान शंकरांनी विश्वकर्माला संदेश पाठवून आमंत्रित केले व सांगितले देवी उमा पार्वती दु:खी कष्टी आहे. तुम्ही तिचे दु:ख दूर करा. तिला जसा हवा तसा महाल बनवून द्या. पार्वती खुष झाली. व विश्वकर्म्याला समजावू लागली. मला समुद्राच्या मध्यभागी एक नगर वसवायचे आहे. ज्याला चार दरवाजे असतिल असा किल्ला बनवायचा आहे, जिथे थंड-गरम पाण्याचे ताल तलाव असतिल, सुंदर बाग-बगिचे, स्वच्छ रस्ते असतिल. माझ्या रंगमहालाच्या छतालाही तुम्ही सोने लावा. सगळे दरवाजे सोन्याचे बनवून मध्ये मध्ये हिरे-मोती जडवा. चमचमणाऱ्या फरश्यांवर रंगीबेरंगी मिनाकारी करा. सोन्याच्या भिंती, छत आंगणही सोन्याचंच बनवा. मंच, पलंग इतकंच काय महालातली भांडी सुद्धा सोन्याचीच हवी. आज पर्यंत असा महाल कुणीच बनवला नसेल. बघितला नसेल. लक्ष्मी ने असा महाल बघितल्यावर तिने मान खाली घातली पाहिजे.

विश्वकर्म्याने सगळे समजावून घेउन आपले अनुयायी ब्रह्मलोकातून बोलावून घेतले. भवन निर्माण कलेचे सगळे सामान सोबत घेउन ते आले. एक सर्वोत्कृष्ठ वास्तूकलाकार म्हणून आदिकालापासून विश्वकर्मा प्रख्यात होता, चित्रकला, मूर्तीकला, ह्या सारख्या नानाविध कला वापरून भवन, वास्तू निर्माण करण्यात तो एकदम निपूण होता. डोळे मिटून आपल्या मनात जी कल्पना करी ती साक्षात डोळ्यांसमोर पूर्णत्वास आणि. तसाच एक चमत्कार विश्वकर्म्या ने ह्या वेळीही दाखवला. समुद्राच्या मधोमध एक अनोखा महाल- दिव्य भवन उभारून दाखवले.

शंकर पार्वती जेव्हा तिथे आले तेव्हा तो स्वर्णमहाल पाहून पार्वती अति हर्षीत झाली. म्हणाली माझं स्वप्नं साकार झालं. माझ्या कल्पनेपलिकडे सुंदर असा हा स्वर्णमहाल बनला आहे. पार्वती शंकराला म्हणाली, "हे त्रिपुरारी ह्याचा गृहप्रवेश करायला हवा. ह्या महालात मला एक यज्ञ करायचा आहे. सर्व देव देवतांसोबत मला लक्ष्मीला पण इथे बोलवायचं आहे. " तिचे आनंदाश्रू पाहून भगवान विचारात पडले. जो जितका खुष होतो तेवढे त्याचे अश्रू वाहतात. त्यांना पार्वतीचं मन मोडवलं नाही. ते तिच्या हो ला हो म्हणत गेले. तेहतिस कोटी देवांना निमंत्रण दिलं गेलं. विश्रवा पंडीत पुजेसाठी बोलावण्यात आले. लक्ष्मी विष्णू, ब्रह्मा इंद्र सगळे सगळे देव आले. समुद्राच्या मध्ये असलेला तो स्वर्णमहल बघून खूप हर्षभरीत झाले.

तेव्हा लक्ष्मीच्या हाताला धरून पार्वती तिला आपला सोन्याच्या विटांनी बनवलेला महाल दाखवू लागली. आणि म्हणाली, "बघ हा चमत्कार त्याच त्रिपुरारीचा ज्याला तू भिक्षू म्हणालीस, हा त्याच भिकाऱ्याचा महाल आहे जो बघायला आज सारी दुनिया आलिये. झरोके खिडक्या दरवाजे इतकंच काय जमिनही सोन्याचीच आहे. माझ्या महालाच्या कोपऱ्याइतकीही तुझ्या महालाची आता लायकी नाहिये. " शंकर म्हणाले, "पार्वती असा वृथा अभिमान करू नये". इतक्यात मंडप सजवून तयार करण्यात आला. शंकर पार्वतीने यज्ञ केला. विश्रवा ऋषी विधी विधान मंत्र पठण करीत होम आहूती पूजेच्या प्रत्येक क्रिया समजावून देत होते. पुर्णाहूती पडल्यावर सर्व देव देवतांनी फुलांचा वर्षाव केला, नभांगण शिवपार्वतीच्या जयजयकाराने दुमदुमू लागले. देव-देवता, योगी-ब्राह्मण, साधू-भिक्षू सगळ्यांची भोजने झाली. नंतर सगळ्यांना मानसन्मानाने दक्षीणा दिल्यावर सर्वांनी प्रस्थान केले.

शेवटी शिवशंकरांनी विश्रवा ऋषींना आपल्याजवळ बोलावले व म्हणाले, "आपल्या येण्याने आज आम्ही धन्य झालो. तुम्हाला जे हवं ते मागा आज आम्ही तुमच्यावर खूप प्रसन्न आहोत. " त्यावर विश्रवा म्हणाले, "भगवान तुम्ही खरंच माझी झोळी भराल? आत्ता तुम्ही जे म्हणालात ते वचन नक्की पुरे कराल? " भगवान म्हणाले, "मनात कसलीही शंका आणू नका. माझे वचन पुर्ण होते असा त्रिलोकी डंका आहे. मी खरंच खूप प्रसन्न झालो आहे. आता तुम्ही मागा तुम्हाला काय हवे ते वरदान देईन. " ह्यावर शीष झुकवून विश्रवा म्हणाले, "हे भगवन! तुम्ही तुमचे वचन पूर्ण करा. मला हा सुवर्णसिंधू हवा आहे. जिथे हे सुंदर भवन उभारले आहे. हाच माझ्या मनात भरला आहे. " हे ऐकताक्षणी सर्व उपस्थित आश्चर्याने पाहू लागले. पार्वतीच्या मनावर जसा वज्रपात झाला. तिच्या स्वप्नांची एका क्षणात राखरांगोळी झाली. तिने विश्रवाला शाप दिला, "एक दिवस असा येईल तुझे नामोनिषाण मिटून जाईल कालौघात तुझी ही सुवर्ण नगरी राख राख होउन जाईल. तुझा दिवा विझून घनघोर रात्र होईल. " आपल्याजवळ होतं नव्हतं ते सारं वैभव, दाग दागिनेही तिने विश्रवा ऋषींना दान करून टाकले. पार्वती निष्कांचन झाली.

ह्या दंतकथेचा वास्तवाशी कदाचित संदर्भ असू असेल.

हे विश्रवा ऋषी म्हणजे रावणाचे पिता. पुढे कालचक्रात रामयुगात राम वनवासात असताना रावणाने सीताहरण केले. सीतेला पळवून नेत असताना तिने रामाला मार्ग कळावा म्हणून मार्गात आपले एक एक करून सगळे अलंकार उतरवून टाकले. ती जेव्हा लंकेला पोहोचली तेव्हा तिचे स्त्रीधनही तिच्याकडे नव्हते. तीपण पार्वती सारखीच निष्कांचन झाली होती. त्यावरूनच लंकेची पार्वती हा शब्दप्रचार आला आहे. वीर हनुमानाने श्रीरामाला सीतेच्या शोधात मदत करत असताना लंकेला जाउन लंकेचे दहन केले. आणि पुढे झालेल्या युद्धात रावण हत्येसह रावणाचा निर्वंश झाला. लंकेच्या पार्वतीचा शाप खरा ठरला.

वीर हनुमानही भगवान शिवाचाच अवतार. कर्ता करविता तोच भोळा सांब.

डमरूवाले बाबा तेरी लीला है न्यारी, जय भोले जय भंडारी!
शिवशंकर महादेव त्रिलोचन कोई कहे त्रिपूरारी, जय भोले जय भंडारी!

*वरील लिखाण एका हिंदी काव्यावर आधारीत आहे.